..तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; खा.बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
पुणे : राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांची (Election) तारीख जाहीर झाली असून उमेदवारांचे अर्जही भरायला सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकानंतर पुढील महिन्यात राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचीही घोषणा होऊ शकते. त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सध्याच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकसंध राहणार की नाही यावरही सखोल चर्चा होत आहे. मात्र, काही मतदारसंघात स्थानिक गणितं वेगळी असल्याचं स्वबळावर लढण्याची भूमिकाही स्थानिक नेते घेत आहेत. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड (Pune) महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आपली स्वबळावर निवडणूक लढवायची तयारी असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील 32 प्रभागात असलेल्या 128 जागांवर स्वबळावर लढवण्याची आमची तयारी आहे. महायुतीतील पक्ष म्हणून राष्ट्रवादी आमच्यासोबत एकत्र येत असेल तर आमची तयारी आहे. मात्र, महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असेही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या तयारीत असताना, शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असेल तर ही युती अशक्य आहे, असे श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय. महायुतीतील घटक पक्षांसोबत युती न झाल्यास स्वबळावर लढणार असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं स्पष्ट दिसत आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र नको, मविआची भूमिका
बारामतीकरांचं जसं शरद पवार साहेबांवर प्रेम आहे, तसंच माझं ही आहे. असं म्हणत दस्तुरखुद्द अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घड्याळाच्या हाताने तुतारी फुंकण्याचे जणू आदेशच दिले. हे पाहून बारामती खालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरु झाली. पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांनी आधीचं प्रस्ताव पाठवलाय. पण यावर शिक्कामोर्तब होण्याआधीचं पिंपरी चिंचवड मविआने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली अन् काहीही झालं तरी आपण अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही, असे ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याकडून बजावूनचं घेतलं. त्यामुळे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.