गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद


मुंबई : गेल्या काही महिन्यात गावोगावी येणाऱ्या बिबट्याची (Leopard) दहशत हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक ह्या समस्येने त्रस्त असताना आता बिबट्याचे मुंबईतील (Mumbai) संभाव्य हल्ले रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे. गोरेगावच्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबटयाचा वावर पाहायला मिळत आहे, हा बिबट्या कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे येथील रहिवाशी लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे.

गावखेड्यात बिबट्याचा संचार आता जणू सर्वसामान्य बाब बनली आहे. कारण, पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात मोठ्या संख्येने बिबट्यांचा रात्री मुक्त संचार पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तीन ते चार नागरिकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून त्यात एका लहान चिमुकलीचाही समावेश आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये वन विभागाबद्दल प्रचंड राग आहे. त्यातच, आता बिबट्या मुंबईतही मुक्त संचार होत असल्याने सोसायटीतील नागरिकही भयभीत झाले आहेत. गोरेगावमधील या भागात अगोदर संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र, या जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये येत आहेत. त्याच, अनुषंगाने सोसायटी सदस्यांच्या पत्राचा दाखला देत, आमदार सुनिल प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहलं आहे. बिबट्याचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे आमदार प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्रात नेमकं काय म्हणाले

गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या, न्यु दिंडोशी रॉयल हिल्स को. ऑप. हौ. सोसायटीचे 77 रो-हाऊस व शेजारी न्यु म्हाडा कॉलनी असून एंकदरित या परिसरात सुमारे 5 हजार रहिवाशी वास्तव्य करीत आहेत. सदरहू परिसरात माहे-आक्टोंबरपासून रात्री- अपरात्री बिबटयांचा संचार होत आहे. या परिसरातील रहिवाशी जनतेमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरहू परिसरात बिबट्याचे तसेच अन्य वन्यजीवांचा संचार होत असल्यामुळे भविष्यात होणारी जीवीतहानी रोखण्यासाठी व वन्यजीवांचे संरक्षण होऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपरोक्त सोसायटीच्या आवारात 26 मे 2023 रोजी सुमारास संरक्षणासाठी म्हाडाची परवानगी घेऊन संरक्षण जाळया बसविण्यात आल्या होत्या, परंतू बिबटे संरक्षण जाळी ओलांडून सोसायटीच्या आवारात येत असल्याचे, येथील रहिवाश्यांच्या निदर्शनास आले आहे.

शेजारील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 6 फुट उंच जाळी ओलांडून बिबटे सोसायटी परिसरात प्रवेश करित आहेत. त्यामुळे, या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन, भीतीदायक जीवन जगत असून नागरिकांना दिवसा ढवळया बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे, असे आमदार प्रभू यांनी वनमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा

बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला

आणखी वाचा

Comments are closed.