धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेला कृष्णा

ठाणे : पुणे, पालघर आणि ठाणे (thane) जिल्ह्यातील काही भागांतही बिबट्याच्या (Leopard attack) वास्तव्याने नागरिकांना दहशतीखाली जगावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, तर काही ग्रामस्थांनी सरकारकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानंतर, वनमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील 50 बिबट्यांना वनतारा येथे हलविण्याचा करार देखील केला आहे. आता, शहापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून एका 8 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आंबा आणण्यासाठी शेतात गेला असता, दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चिमुकल्यावर झडप घातली, या हल्ल्यात लहानग्याने आपली जीव गमावला.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आईच्या कुशीत झोपलेल्या दोन वर्षीय बालिकेस जंगली श्वापदाने पळून नेत ठार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र संताप होत असतानाच आणखी एक लहान मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा भागवत अगीवले (वय 8) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णा हा मित्रांसोबत आंबे पाडण्यासाठी गेला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगलात मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर, कसारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस व वनविभाग संयुक्तपणे करीत आहेत. दरम्यान, वनविभागाने संबंधित बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्या आणि वन्य जीवांपासून नागरिकांच्या सुरक्षेला धोका असल्याचा प्रश्न प्रकर्षणाने पुढे आला आहे.

हेही वाचा

रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या 2 महिन्यांच्या बाळासोबत आक्रीत घडलं; पहाटे दृष्य पाहताच अख्ख गाव हादरलं, जळगावच्या चोपड्यातील घटना

आणखी वाचा

Comments are closed.