राज-उद्धव ठाकरेंनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा करताच वसंत मोरेंनी काय केलं?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईच्या वरळी येथील पत्रकारपरिषदेत मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि मनसेच्या (MNS) युतीची घोषणा केली. यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकच जल्लोष केला. राज आणि उद्धव (Uddhav Thackeray) हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. मुंबईपुणे, नाशिकसह राज्यभरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज-उद्धव (Raj Uddhav Alliance) यांच्या अधिकृत युतीच्या घोषणेनंतर आनंद साजरा केला. या आनंदात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि कट्टर राज ठाकरे (Raj Thackeray) समर्थक वसंत मोरे (Vasant More) हेदेखील सामील झाले होते. वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज चौकात रस्त्यावर लाडू वाटून हा क्षण साजरा केला. (Pune Mahangarpalika Election 2026)
विशेष म्हणजे वसंत मोरे ज्याठिकाणी लाडू वाटत होते तिथूनच काही अंतरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही राज-उद्धव युतीच्या घोषणेचा आनंद साजरा करत होते. मात्र, वसंत मोरे त्यांच्यासोबत सहभागी न होता स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर फिरुन लाडू वाटत होते. यावेळी त्यांनी ‘उद्धव साहेब आगे बढो, राज साहेब आगे बढो’, अशा घोषणाही दिल्या. वसंत मोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वसंत मोरे हे एकेकाळी पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा होते. पुण्यात मनसे असं नाव घेतलं की लोकांच्या तोंडी आपोआप वसंत मोरेंचे नाव यायचे. मनसेची खळखट्याक शैली आणि वसंत मोरे यांचे आक्रमक नेतृत्व या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक होत्या. मात्र, मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवण्याचा राज ठाकरे यांचा आदेश मानण्यास वसंत मोरे यांनी नकार दिला होता. माझ्या मतदारसंघातील अनेक मतदार मुस्लीम आहेत. त्यांनी इतकी वर्षे मला साथ दिली आहे, त्यांच्याविरोधात मी कसा आंदोलन करु, असा सवाल विचारत वसंत मोरे यांनी राजादेश मानण्यास नकार दिला होता. त्यानंतर वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यातील अंतर वाढत गेले. दरम्यानच्या काळात त्यांचे पुण्यातील मनसे नेत्यांशीही बिनसले. अखेर 2024 मध्ये वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता शिवसेना आणि मनसेची युती झाल्याने वसंत मोरे यांची काहीशी गोची होण्याची शक्यता आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडताना पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी प्रचंड बिनसले होते. परंतु, आता शिवसेना-मनसे युतीमुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वसंत मोरे यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.