…म्हणून राष्ट्रवादीचे खा. बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; म्हात्रेंचं स्पष्टीकरण
ठाणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षात पक्षीय स्तरावर आणि नेतेमंडळींच्या पक्षांतराच्या आश्चर्यकारक घटना घडल्या आहेत. त्यामुळे, कोणता पक्ष कधी कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडीत जाईल. तसेच, कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल हे सांगणे कठीण आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत दोन शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर, आता भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे शिवसेना (Shivsena) उपतालुकाप्रमुखांच्या जनसंपर्क कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा (NCP) यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मराठी (एकनाथ शिंदे) तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो एकत्र लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदाराचा एकनाथ शिंदेंच्या फोटोसह बॅनर लागल्याने सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. आता, या संदर्भात भिवंडी शिवसेना उपतालुकाप्रमुख विवेक म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. म्हात्रे म्हणाले की, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे असून ते आपले गुरुवर्य आणि आधारस्तंभ आहेत. लहानपणापासून त्यांचे मार्गदर्शन मला लाभले असून त्यांनी अनेकवेळा आपल्याला सांभाळून घेतले आहे. त्यामुळेच, त्यांच्या बॅनरवर बाळ्या मामांचा फोटो लावणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आमचे मुख्य नेते असून आपण शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख आहोत, त्यामुळे त्यांच्या आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फोटोसह हा बॅनर लावण्यात आला आहे. या बाबतीत कोणताही राजकीय गैरसमज करू नये, असेही विवेक म्हात्रे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बॅनरवर खासदार बाळ्या मामा यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.
भिवंडीत भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौर पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, सेक्युलर विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येत “भिवंडी सेक्युलर फ्रंट” या संयुक्त मंचाची स्थापना केली आहे. महापौर पदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा 46 चा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्ष यांनी ही महत्त्वपूर्ण राजकीय आघाडी उभारली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस पार्टीने सर्वाधिक 30 जागा मिळवल्या आहेत. तर NCP(SP) ला 12 जागा आणि समाजवादी पार्टीला 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे, या तिन्ही सेक्युलर पक्षांची एकत्रित संख्या 48 होत असून, महापौर पदासाठी आवश्यक बहुमत सहजपणे पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, महापौर पदावर सेक्युलर विचारांचा प्रतिनिधी बसवण्यासाठी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची घोषणा केली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.