राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा तपशील पुढे, भाई म्हणाले, धन्यवाद, राज ठाकरेही म्हणतात.
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटींतर मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंची (मराठी) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर, अनेकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात सभा देखील घेतली होती. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले. तरीही राज यांनी एकनाथ शिंदेंवर प्रखर टीका करणे टाळले होते. आता, महापालिका (KDMC) निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच दोन नेते एकत्र आल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंनी आज ठाण्यातील नंदनवण बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेऊन 20 ते 25 मिनिटे चर्चा केली.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या. तर, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला हवं तसं यश मिळालं नाही. मात्र, भाजप-शिवसेनेविरुद्ध लढणाऱ्या मनसेनं महापौर निवडीवेळी शिंदेंच्या शिवसेनेसा पाठिंबा दिला. त्यामुळे, सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेल्या मनसेनं थेट शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने पुन्हा ह्या पाठिंब्याची चर्चा झाली.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहिल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह इतरही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली. त्यावर येवढं मोठं काही करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते जरी असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी कोणाला भेटायला जावं, जाऊ नये, यावर आम्ही काही बोलू शकत नाही. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यामध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. एका पक्षाचे प्रमुख राज्याच्या उपमुख्यमंत्र्याना भेटतात, यामध्ये नक्कीच काहीतरी कारणं असू शकतात, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.