रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, फडणवीस म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असून सीबीआयने देखील याबाबत माहिती दिली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित यांनी युगेंद्र पवार आणि कार्यकर्त्यांसह बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर, रोहित पवारांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत चर्चा केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी विधिमंडळ सभागृहात भेट घेतली.
राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदार, मंत्री आणि दिग्गज नेते विधिमंडळातच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा प्रकर्षणाने लावून धरला आहे. रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्याची भेट घेण्याचं कारण हे, माझ्या आणि महाराष्ट्रातील सर्वांच्या मनात ज्या शंका आहेत, त्या शंका घेऊन मी मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडली. सगळे रिसर्च पेपर आणि कागदपत्रे माझ्याकडे आले आहेत, ते मी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. देशातही आज भाजपचे सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडे ही बाजू मांडावी. या चौकशीत पारदर्शकता यावी अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, आणखी काही कागदपत्रांची मागणी त्यांनी माझ्याकडे केली, ती कागदपत्रे घेऊन ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारकडून हा अहवाल येणार आहे, उद्यापार्यत हा अहवाल येईल अशी अपेक्षा आहे. थातूरमाथुर अहवाल देऊ नका डिटेल्स अहवाल आम्हाला हवा आहे. सोमवारी 11 वाजता मी डिटेल्स पत्रकार परिषद घेणार आहे, आणखी काही गोष्टी समोर आणणार आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
बारामतीमध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी इच्छा होती, तिथे खूप गर्दी होईल म्हणून मी मरीन ड्राईव्हला गेलो. नवीन कायद्यानुसार झिरो FIR बिएनएस कायद्याअंतर्गत व्हावी अशी इच्छा होती. पण तिथे गुन्हा दाखल झाला नाही, म्हणून साहजिकच जिथे घटना झाली तिथे बारामतीला जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर, CID मध्ये व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.
पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हा दखल करण्याबाबत काही पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करुन तांत्रिक अडचणींबाबत काय आहे हे समजून घेतो.
देवगिरी बंगल्यावर स्मारक व्हावं
दिवंगत अजित पवार गेल्या 22 वर्षांपासून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राहात होते, याठिकाणी अजित दादाचं स्मारक असावं अशी मागणी मी केली आहे. विधानभवन परिसरातही दादांचं स्मारक व्हावं, बारामती विमानतळवर नाईट लँडिंग व्हावी, अत्याधुनिक विमानतळ व्हावं, या विमानताळाला अजित दादांचा नाव द्यावं, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. तर, पुण्याच्या रिंग रोडलाही अजित पवार यांचं नाव द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
सुदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरीत कायम
विमानात जे इतर लोक होते, अजित दादांसोबत सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांचाही मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी ठाणे महापलिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांना पर्मनंट करावं अशी विनंतीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राज ठाकरेंची भेट, पाठिशी असल्याचा विश्वास
राज ठाकरे साहेब हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. मला विश्वास आहे की, अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यात राज ठाकरे हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं राहतील.
आणखी वाचा
Comments are closed.