IPL 2026 – टीम इंडियाच्या ब्रम्हास्त्राची पाटी अजूनही कोरीच, सलग 5 सामन्यांत एकही विकेट नाही; इरफान पठाणने सांगितलं कारण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आणि टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. गुरुवारी (16 एप्रिल 2026) वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहने 41 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. विशेष म्हणजे, या हंगामातील हा त्याचा सलग पाचवा सामना होता ज्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही.

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने बुमराहच्या या खराब कामगिरीचे युट्यूब चॅनलवर विश्लेषण केले आहे. पठाणच्या मते, बुमराह सध्या गरजेपेक्षा जास्त ‘स्लोअर बॉल्स’ टाकत आहे. तो म्हणाला, “बुमराहच्या फॉर्ममध्ये मोठी अडचण नाही, पण त्याचा सरासरी वेग 130 किमी प्रतितास आहे. तो तब्बल 44 टक्के वेळा स्लोअर चेंडू टाकत आहे, याचा अर्थ प्रत्येक दुसरा चेंडू हळू असतो. जर त्याने हा वेग वाढवला आणि स्लोअर चेंडूंचे प्रमाण 30-35 टक्क्यांवर आणले, तरच त्याचे चेंडू अधिक प्रभावी ठरतील.”

IPL 2026- हार्दिक पंड्याकडून MI चे कर्णधारपद काढून पुन्हा रोहित शर्माकडे सोपवा, दिग्गज खेळाडूची मागणी

पंजाब किंग्जने 196 धावांचे लक्ष्य अवघ्या 16.3 षटकांत पूर्ण करत मुंबईचा पराभव केला. प्रभसिमरन सिंगने नाबाद 80 आणि श्रेयस अय्यरने 66 धावांची खेळी करत बुमराहसह मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा या हंगामातील हा सलग चौथा पराभव ठरला असून, त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी केवळ पहिला सामना जिंकला आहे. पठाणने सुचवल्याप्रमाणे बुमराहने आपल्या शैलीत बदल केल्यास मुंबईला कमबॅक करण्याची आशा आहे.

Comments are closed.