रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका…; भारतीय दिग्गजा
एमआयच्या नुकसानासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने विजयाने सुरुवात केली, पण दुसऱ्या सामन्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभवाचा धक्का आहे. संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. आता पंजाब किंग्सविरुद्ध (PBKS) पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
रोहितवर अन्याय झाला…; मनोज तिवारी यांनी एमआय लीडरशिपवर प्रश्न केला
मुंबई इंडियन्सच्या या निराशाजनक कामगिरीवर माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘क्रिकबझ’शी बोलताना तिवारीने नेतृत्वबदलाचा सल्ला दिला. तो म्हणाला की, “हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करत आहे, ते प्रभावी वाटत नाही. कर्णधार म्हणून तुम्हाला मैदानात सक्रिय राहणे गरजेचे असते. माझ्या मते, जर परिस्थिती सुधारायची असेल, तर हार्दिकने स्वतःहून कर्णधारपदावरून पायउतार व्हायला हवे आणि ही जबाबदारी पुन्हा रोहित शर्माकडे सोपवायला हवी. रोहितला कर्णधारपदावरून हटवणे हा त्याच्यावर झालेला अन्याय होता.”
तिवारी पुढे म्हणाला की, केवळ यंदाच्या अपयशाकडे पाहून चालणार नाही, तर या समस्येचे मूळ शोधावे लागेल. “2015 ते 2023 या काळात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला शून्यातून उभे करत पाच जेतेपदे मिळवून दिली. संघात ती मालकीची भावना पुन्हा निर्माण करण्यासाठी रोहितचे नेतृत्व आवश्यक आहे.”
रोहितचा सुवर्णकाळ विरुद्ध हार्दिकचा संघर्ष (Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya)
मुंबई इंडियन्सचा सुवर्णकाळ हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच आला. त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील तगड्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK) अनेकदा फायनलमध्ये धूळ चारली आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला (GT) पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते, परंतु मुंबईत परतल्यापासून त्याला ती जादू पुन्हा दाखवता आलेली नाही.
चाहत्यांचा संताप (Mumbai Indians IPL 2026)
दोन वर्षांपूर्वी जेव्हा रोहितकडून हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले, तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये नाराजी होती. आता खराब कामगिरीमुळे या आगीत तेल ओतले गेले आहे. सोशल मीडियावरही हिटमॅनला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई इंडियन्ससाठी या हंगामात पुनरागमन करणे कठीण असले तरी अशक्य नाही. मात्र, त्यासाठी हार्दिकला आपल्या रणनीतीत मोठे बदल करावे लागतील किंवा संघ व्यवस्थापनाला मनोज तिवारीने सुचवल्याप्रमाणे काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.