बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 चा उल्लेख

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती (Baramati) पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ आज बारामतीत जाहीर सांगता सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी भाषण करत अजित पवारांच्या आठवणी जागवल्या, तसेच सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन देखील केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी भाषण करत अजित दादांच्या आठवणी सांगितल्या. तर, रुग्णालयात दाखल असल्याने आणि प्रकृती कारणास्तव शरद पवार आज बारामतीत येऊ शकले नाहीत. मात्र, अगदी शरद टायमिंग जुळवत सुनेत्रा पवारांचे भाषण होताच शरद पवारांनी (Sharad pawar) ट्विट करुन आपलं मनोगत बारामतीकरांपुढे मांडलं. सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

शरद पवार दिल्लीहून 2 दिवसांपूर्वी मुंबईत आले, त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात एडमिट आहेत. हाताला जखम झाली होती, त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले. सोमवारी म्हणजेच आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभेत उपस्थित राहिले नसले तरी, सांगता सभा सुरू असतानाच शरद पवारांनी ट्विट करुन बारामतीकरांना आवाहन केलंय.

पहिल्यांदाच मतदानाला उपस्थित राहू शकत नाही – शरद पवार

मी 1967 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो, असे शरद पवारांनी आपल्या ट्विटमधून सांगितलं

आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला.

मतदानाचा दुसरा पर्याय उपलब्ध नाही

दरम्यान, मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला, असेही शरद पवारांनी सांगितले. तसेच, या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे आवाहन बारामतीकरांना केले.

हेही वाचा

Video: …तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय

आणखी वाचा

Comments are closed.