IPL 2026 – 21 व्या वर्षीच मुलाचं करियर संपलं असतं…, मयंक यादवसाठी इयान बिशपची भावूक पोस्ट, ट्रोलर्सना दिलं सडतोड उत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने तब्बल 353 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मैदानात पाऊल ठेवले. आपल्या 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या या 23 वर्षीय खेळाडूकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पाठीच्या दुखापतीतून सावरून परतलेल्या मयंकसाठी हे पुनरागमन अत्यंत आव्हानात्मक ठरले. त्याने आपल्या चार षटकांमध्ये 56 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आला नाही. मयंकच्या या खराब कामगिरीचा परिणाम लखनऊच्या निकालावर झाला आणि त्यांना 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या निराशानजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर मयंक यादवला टीकेला सामोरे जावे लागले, मात्र वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू इयान बिशप त्याच्या समर्थनार्थ धावून आले. बिशप यांनी ‘एक्स’वर चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करताना म्हटले की, वयाच्या 21 व्या वर्षी करिअर धोक्यात असताना पुन्हा एकदा 150 किमी वेगाने गोलंदाजी करणे हा एक चमत्कारच आहे. मयंकने केवळ तंदुरुस्त राहावे, टप्प्यावर नियंत्रण हळूहळू परत येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. टीका करण्यापेक्षा एका युवा खेळाडूच्या जिद्दीचे कौतुक व्हायला हवे, अशा शब्दांत त्यांनी मयंकचा बचाव करत टीकाकारांना सुनावलं आहे.

लखनऊ सुपर जायंट्ससाठी आयपीएल 2026 चा हा हंगाम आतापर्यंत चढ-उतारांचा ठरला असून, राजस्थानविरुद्धचा पराभव हा त्यांचा पाचवा पराभव होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर संघाने हैदराबाद आणि कोलकाताविरुद्ध विजय मिळवून पुनरागमन केले होते, परंतु त्यानंतर सलग झालेल्या पराभवांमुळे त्यांची गुणतालिकेतील स्थिती खालावली आहे. लखनऊचा संघ आता 26 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरेल.

IPL 2026 – चेन्नईचा नवा डाव! आयुष म्हात्रेच्या जागी वेगवान गोलंदाजाची वर्णी

Comments are closed.