पाकिस्तानचे सॅफमधून पलायन, मैदानाऐवजी पाकिस्तानचा राजकारणाचा खेळ
दक्षिण आशियातील प्रतिष्ठsच्या सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपपूर्वीच पाकिस्तानने माघार घेत पुन्हा एकदा खेळावर राजकारणाची सावली टाकली आहे. मैदानात लढण्याऐवजी राजकीय कारणांचा आधार घेत पाकिस्तान फुटबॉल महासंघाने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आणि क्रीडाजगतात अक्षरशः संतापाची लाट उसळली.
येत्या 25 मे ते 6 जूनदरम्यान गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे रंगणाऱया या स्पर्धेकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागलेले असताना पाकिस्तानच्या या निर्णयाने स्पर्धेपूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण असल्याचे कारण पुढे करत पाकिस्तानने माघार घेतली, पण हा निर्णय म्हणजे खेळाडूंच्या स्वप्नांवर घाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
पाकिस्तानच्या माघारीनंतर स्पर्धेचा रंग कमी होण्याऐवजी आता सहा संघांमध्ये जोरदार लढत रंगणार आहे. हिंदुस्थान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि मालदीव हे संघ मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ढाका येथे पार पडलेल्या सोडतीनुसार दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक सामना आता अधिक चुरशीचा होणार आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या महिला फुटबॉलसाठी मोठा धक्का ठरला आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचा संघ हळूहळू उभारी घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करत होता. ही स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुवर्णसंधी होती. मात्र पुन्हा एकदा राजकीय वादळामुळे खेळाडूंच्या हातून मोठे व्यासपीठ निसटले आणि मेहनतीवर पाणी फिरले आहे.
हिंदुस्थानात होणाऱया स्पर्धांमधून पाकिस्तानने माघार घेण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप आणि आशिया कपसारख्या मोठय़ा स्पर्धांना दांडी मारली होती. त्यामुळे दक्षिण आशियात खेळ आणि राजकारणाचा संघर्ष अजूनही संपलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ हिंदुस्थान असून त्यांनी पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे, तर बांगलादेशने 2022 आणि 2024 या सलग दोन स्पर्धांत किताब जिंकत आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे यंदाची लढत हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यात रंगण्याची शक्यता अधिक असून संपूर्ण स्पर्धेचे लक्ष याच दोन संघांवर खिळलेले असेल.
Comments are closed.