नाडाच्या धाडीने डोपिंग रॅकेट उघडकीस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानात डोपिंगच्या काळय़ा सावलीवर मोठा प्रहार करत नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या (नाडा) इंटेलिजन्स अॅण्ड इन्व्हेस्टिगेशन युनिटने नजफगढमध्ये बंदी घातलेल्या औषधांचा मोठा साठा जप्त करत डोपिंग माफियांना जबर धक्का दिला. नाडाच्या अचूक टिप-ऑफनंतर स्थानिक पोलीस, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर्स आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला आहे.

या धडक कारवाईत तब्बल 2,800 कॅप्सूल्स आणि टॅबलेट्स तसेच 11 इंजेक्शन युनिट्स जप्त करण्यात आले. यात मेथेनोलोन एनन्थेट, ट्रेनबोलोन आणि स्टॅनोजोलोलसारख्या घातक अॅनाबॉलिक स्टेरॉइड्सचा समावेश आहे. याशिवाय 300 मेथँडिएनोन, 850 ऑक्सँड्रोलोन टॅबलेट्स आणि तब्बल 1,500 सिलेक्टिव्ह अँड्रोजन रिसेप्टर मॉडय़ुलेटर कॅप्सूल्सचा साठा गौरव वत्स न्यूट्रिशन या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आला. हा संपूर्ण धंदा गौरव वत्स नावाच्या व्यक्तीकडून चालवला जात होता.

हे सर्व पदार्थ वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीने स्पष्टपणे बंदी घातलेले असून स्नायू वाढवण्यासाठी आणि कामगिरीत कृत्रिम फायदा मिळवण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जातो. एवढेच नाही तर सहनशक्ती वाढवणारे अॅडेनोसिन मोनोफॉस्फेटचे इंजेक्शनही जप्त करण्यात आले, जे हार्मोन आणि मेटाबॉलिक मॉडय़ुलेटर म्हणून बंदी घातलेले आहे.

अलीकडेच हिंदुस्थानात आलेल्या वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीचे अध्यक्ष वितोल्ड बंका यांनी हिंदुस्थान हा बंदी घातलेल्या परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्जचा सर्वात मोठा उत्पादक असल्याचे वक्तव्य केले होते आणि या कारवाईने त्या दाव्याला पुष्टी मिळाल्याचे चित्र आहे.

Comments are closed.