विकृत धीरेंद्र शास्त्रीला साधू-संत म्हणताना फडणवीसांना लाज वाटली पाहिजे; हर्षवर्धन सपकाळ यांनी फटकारले
नागपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते आणि त्यामुळे त्यांनी समर्थ रामदासांकडे जाऊन राज्य कारभार सांभाळण्याची प्रार्थना केली’ असे विधान बागेश्वर बाबाने केले. विशेष म्हणजे, ज्यावेळी हे विधान केले गेले तेव्हा व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. या प्रकारावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विकृत धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केल्याने हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमान असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या विचार आणि कार्याने ही संत परंपरा समृद्ध केली आहे. अशा महान परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाची तुलना करताना किंवा त्याला जोडताना देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, असे खडेबोल सपकाळ यांनी सुनावले आहेत.
विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक…
— हर्षवर्धन सपकाळ (@INCHarshsapkal) 26 एप्रिल 2026
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच असल्याचे सांगत भाजपच्या हिंदुत्वावर आणि इतिहासाच्या मोडतोडीवर निशाणा साधला आहे. शिवप्रेमींकडून या विधानाचा राज्यभर निषेध होत असतानाच, काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केल्यामुळे आता हा वाद राजकीय वर्तुळात अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Comments are closed.