धक्कादायक प्रकार, कारमध्ये आलेल्या टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं; हॉकी स्टिकने मारहाण
पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. तसेच, पोलिसांपुढे (Police) पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना, गँगवार आणि टोळक्यांना रोखण्याचं मोठं आव्हान आहे. नुकतेच खेड तालुक्यातील एका घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एक कारचालक संबंधित व्यक्तीला चक्क कारने फरफटत नेत असल्याचं दिसून येतं. तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाने घेतलेलं हे भीषण रुप पाहून स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
चारचाकी गाड्यांमधून आलेल्या टोळक्याने गावात दहशतीचा थरार माजवत संबंधित व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि एकाला चक्क गाडीच्या बोनटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अक्षय डुंबरे यांनी त्यांच्या हायवा गाडीच्या कामाचे पैसे आरोपींकडे मागितल्याने हा वाद उफाळल्याची माहिती आहे. संतप्त आरोपींनी काळूस ग्रामपंचायत परिसरात येत अक्षय डुंबरे यांना गाडीतून ओढून बाहेर काढत मारहाण केली. त्यानंतर, त्यांच्या आई-वडिलांसह मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शेखर पोटवडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, आरोपी पळून जात असताना गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना गाडीच्या बोनटवर उचलून सुमारे 100 फूट फरफटत नेण्यात आले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आलाय.
रीलसाठी रस्त्याव पेट्रोल ओतून धोकादायक स्टंट
गोरेगावमध्ये वाढदिवसाच्या रीलसाठी धोकादायक स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. गोरेगाव पश्चिमेत रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा प्रकार घडला. गोरेगाव पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन धोकादायक स्टंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांस अटक केली आहे. वाढदिवसाच्या रीलसाठी कार डीलर फहाद शेखने रस्त्यावर पेट्रोल टाकून धोकादायक स्टंट केला, राम मंदिर रोडजवळ सोमाणी ग्राम परिसरातील सनटेक सिटी 4th Avenue बाहेरील रस्त्यावर हा प्रकार घडला. त्यामुळे, एमएमआरडीए रस्त्याचे चार ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती असून जवळ उभी वाहने पेट घेण्याचा मोठा धोका टळला. मात्र, या घटनेनं रहिवाशांमध्ये संताप आणि सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तसेच, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी देखील मुंबई पोलिसांकडे करण्यात आली. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पेट्रोल टाकून रील बनवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव फहद खलील समशुद्दीन शेख, (वय 33 वर्षे) आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.