हैदराबादला मोठा धक्का! सलग 5 विजयांनंतर संघाचा पर्पल कॅप होल्डर गोलंदाजाने अचानक संघ सोडला…

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2026 मध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. आपला सलामीचा सामना गमावल्यानंतर, त्यांनी सलग पाच विजय नोंदवले, ज्यामुळे ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. आपल्या मागील सामन्यात, 244 धावांचा पाठलाग करताना संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या विजयात वेगवान गोलंदाज इशान मलिंगाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत केवळ 29 धावा देत 1 बळी मिळवला. या एका बळीमुळेच मलिंगाला ‘पर्पल कॅप’ देखील मिळाली.

मात्र, सनरायझर्सचा हा ‘पर्पल कॅप’ धारक खेळाडू आता अचानक संघ सोडून श्रीलंकेला परतला आहे. श्रीलंकेतील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी व्हिसा-संबंधित काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मलिंगाला श्रीलंकेला जावे लागले, परंतु तो शुक्रवार, १ मे रोजी पुन्हा भारतात परतणार आहे. मलिंगाव्यतिरिक्त, कामिंदू मेंडिस आणि दिलशान मधुशंका हे खेळाडूही श्रीलंकेला परतले आहेत.

आयपीएल 2026 मध्ये इशान मलिंगा सनरायझर्स हैदराबादसाठी जबरदस्त कामगिरी करत धुमाकूळ घालत आहे. या हंगामात इशानने आपल्या संघासाठी एकूण 9 सामने खेळले असून, त्यात त्याने एकूण 15 विकेट मिळवले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत मिळवलेल्या बळींच्या बाबतीत, केवळ भारताचा भुवनेश्वर कुमार (14) हाच मलिंगाच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, सनरायझर्स हैदराबाद संघाने मलिंगाला केवळ 1.20 कोटी रुपयांना संघात कायम (retain) केले होते. त्यामुळे, इतक्या कमी रकमेत मलिंगाच्या रूपाने सनरायझर्सच्या हाती मोठा जॅकपॉट लागला आहे, असे म्हणता येईल.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2026 ची सुरुवात पराभवाने केली होती. त्यांचा पहिला सामना गतविजेत्या आरसीबी संघाविरुद्ध झाला होता. त्यानंतर त्यांनी केेकेआरचा पराभव केला, परंतु त्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या पराभवांमधून सावरत, संघाने आता सलग पाच सामने जिंकून प्ले-ऑफमधील आपले स्थान बळकट केले आहे. सनरायझर्सचे या हंगामात अजून पाच लीग सामने बाकी आहेत. जर संघाने उर्वरित सामन्यांमध्ये हीच गती कायम राखली, तर त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित आहे.

Comments are closed.