वानखेडेवर सराव सुरू होता अन् अचानक माहीने जवळ बोलावलं…; आयुष म्हात्रेने सांगितला MS धोनीसोबतच

Ayush Mhatre Majha Vision 2026 : यंदा आयपीएल (IPL 2026) 19व्या हंगामात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला स्पर्धेच्या मध्यातच मोठा धक्का बसला आहे. जेव्हा मुंबईचा उदयोन्मुख आणि आक्रमक फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा व्हिजन’ कार्यक्रमात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्वप्नवत प्रवास आणि ‘माही’ मंत्र

कार्यक्रमात बोलताना आयुष म्हात्रे भावूक झाला होता. त्याने सांगितले की, “चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघाचा भाग असणे हा माझ्यासाठी स्वप्नवत प्रवास आहे. माझा क्रिकेटचा आलेख हळूहळू उंचावत आहे, पण ही दुखापत दुर्दैवी आहे.”

महेंद्रसिंग धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना आयुष म्हणाला, “जेव्हा गेल्या 2024 हंगामात ऋतुराज गायकवाड जखमी होता आणि मुंबईत सामना होणार होता, तेव्हा सरावाच्या दरम्यान एमएस धोनीने मला जवळ बोलावले. त्यांनी मला एकच मोलाचा सल्ला दिला की, ‘तुझा नैसर्गिक खेळ जसा आहे तसाच सुरू ठेव, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस.’ एका महान खेळाडूने दिलेला हा आत्मविश्वास माझ्यासाठी खूप मोठा होता.”

रोहित शर्माबद्दल का म्हणाला आयुष म्हात्रे?

रोहित शर्माने आयुषला युकेमधील क्रिकेट वातावरणाबद्दल तब्बल अडीच तास मार्गदर्शन केले. “माझ्या मनात काहीही शंका असेल तर मी त्यांना कधीही फोन करू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे,” असे आयुषने अभिमानाने नमूद केले.

लोकलचा प्रवास आणि कौटुंबिक पाठबळ

आयुषने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले. आजही तो मुंबईच्या लोकलने प्रवास करतो. तो म्हणाला, “माझे वडील आणि काका नसते तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. वडिलांना नोकरीमुळे नेहमी मला सरावासाठी घेऊन जाणे शक्य नसायचे, अशा वेळी माझे आजोबा आणि काकांनी मला मदत केली. खांद्यावर जड किट बॅग घेऊन शाळा आणि तिथून चर्चगेट असा लोकलचा प्रवास आजही माझ्या स्मरणात आहे.”

चेन्नईसाठी सर्वाधिक धावा

आयुष म्हात्रेने या हंगामात चेन्नईसाठी सहा लीग सामने खेळले असून, सहा डावांमध्ये 33.50 च्या सरासरीने आणि 177.87 च्या स्ट्राइक रेटने 201 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन अर्धशतके झळकावली, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती. म्हात्रे आतापर्यंत चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज, संजू सॅमसन, 192 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

आयुष म्हात्रेची आयपीएल कारकीर्द

आयुषने 2025 च्या आयपीएल हंगामात पदार्पण केले आणि दोन्ही हंगामात तो चेन्नई संघाचा भाग होता. या युवा सलामीवीराने आतापर्यंत स्पर्धेत 13 सामने खेळले आहेत. 13 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 33.92 च्या सरासरीने आणि 183.75 च्या स्ट्राइक रेटने 441 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली असून, त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 94 धावा होती.

आयुष म्हात्रेने सांगितला MS धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा – Video

हे ही वाचा –

GT vs RCB Live Score IPL 2026 : पॉईंट्स टेबलचा गेम बदलणार! RCB पहिल्या स्थानावर झेप घेणार की GT देणार धक्का?, जाणून घ्या LIVE अपडेट्स

आणखी वाचा

Comments are closed.