“बरं झालं मी त्यांच्याविरुद्ध बॉलिंग करत नाही”, एसआरएचचा कॅप्टन कमिन्सला स्वत:च्याच फलंदाजांची वाटते भीती

आयपीएल २०२६ मध्ये पराभवाने सुरूवात झालेल्या सनरायझर्स हैद्राबादने जो की विजयाचा वेग पकडला आहे, ते एकामागोमाग एका संघाला पराभूत करत सुटले आहेत. बुधवारी (२९ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एसआरएचने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि आयपीएलमधील त्यांचा १०० वा विजय नोंदवला. या सामन्यात एमआयने दिलेले २४४ धावांचे लक्ष्य ज्याप्रकारे फलंदाजी करत त्यांनी पार केले ते पाहून त्यांच्याच कर्णधाराला आश्चर्य वाटले आहे.

सामन्यानंतर एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, मला सुरुवातीला नेहमीच असे वाटायचे की हे आव्हान पेलणे कठीण जाईल; पण आमची फलंदाजीची फळी आणि अर्थातच खेळपट्टीची उत्तम स्थिती पाहता, हे लक्ष्य आपल्या आवाक्यात नक्कीच आहे असे मला वाटले. काही गोष्टी आमच्या पथ्यावर पडणे गरजेचे होते, पण तरीही हे लक्ष्य गाठणे शक्य आहे असे मला वाटले.”

तुमच्याकडे असलेली सलामीची जोडी पाहता, त्यांच्या मनातून भीती ही गोष्ट पूर्णपणे निघून गेली आहे का हा प्रश्न विचारला असता कमिन्स म्हणाला, “तशीच आशा आहे. तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा खेळपट्टी चांगली असते, तेव्हा ज्या प्रकारे ते फलंदाजी करतात, त्यांच्याकडे विविध प्रकारचे इतके फटके उपलब्ध असतात की मला तर असे वाटते की, सुदैवाने मला त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी करावी लागत नाही. ते फलंदाजी करताना खरोखरच खूपच धाक निर्माण करणारे वाटतात.”

कमिन्सला त्याचे गोलंदाज अधिक धावा खर्च करत आहेत, याचीही चिंता नाही. त्याबद्दल तो म्हणाला, “पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजची आयपीएल खूपच वेगळी आहे. तुम्हाला माहितीच असेल, पूर्वी २०० धावांचा पाठलाग करणे जरा कठीण जायचे. पण आता, अगदी १२ पेक्षा जास्त सरासरीने धावांची गरज असली, तरीही एक फलंदाजी गट म्हणून आपण त्या गाठू शकतो, असा आत्मविश्वास वाटतो. त्यामुळे, एक गोलंदाजी गट म्हणून तुम्हाला तुमच्या अपेक्षांमध्ये थोडा बदल करून त्या नव्याने निश्चित कराव्या लागतील. मला गोलंदांजाबद्दल खूप सहानुभूती वाटते. अशा मोठ्या धावसंख्येच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांच्या हाती फारसे काही लागत नाही. तरीही, तुम्हाला असे नक्कीच वाटते की अगदी सामन्याच्या शेवटच्या टप्प्यातही जर तुम्ही एखादा अचूक यॉर्कर टाकला, तर तोच चेंडू सामन्याचा निकाल बदलणारा निर्णायक क्षण ठरू शकतो.”

या सामन्यात एमआयने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. रायन रिकल्टनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावत २४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात एसआरएचने पुन्हा एकदा आक्रमक सुरूवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी सलामीला ५२ चेंडूत १२९ धावांची भागीदारी केली. यामध्ये अभिषेकने २४ चेंडूत ४५ धावा केल्या. हेडने ३० चेंडूत ८ षटकार आणि ४ चौकार मारत ७६ धावा कुटल्या. मागील काही सामन्यांमध्ये हेडची बॅट शांत होती, मात्र एमआयविरुद्ध तो स्फोटक खेळी करत लयीत परतला.

अभिषेक-हेडनंतर हेनरिच क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ८० धावांची भागीदारी केली. रेड्डी बाद झाल्यानंतर (२१ धावा, १७ चेंडू) क्लासेनने सलील अरोरासोबत ३६ (१४) धावांची भागीदारी केली. हा सामना एसआरएचने ६ विकेट्सने जिंकला. क्लासेन ६५ धावा आणि अरोरा ३० धावा करत नाबाद राहिले.

Comments are closed.