वडाळ्यातील भूखंड विकासकाच्या घशात घालण्याचा डाव उधळला! सत्ताधाऱ्यांवर प्रस्ताव राखून ठेवण्याची नामुष्की

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालिका सभागृहात बहुमत असतानाही वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेचा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव शिवसेनेसह विरोधकांनी भक्कम एकजूट दाखवत हाणून पाडला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर प्रस्ताव राखून ठेवण्याची नामुष्की ओढवली.

वडाळा रफी अहमद किडवाई मार्ग येथील दादर नायगाव विभाग येथील आझाद नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या मालमत्तेचा विकास तसेच लगतच्या कमला नगर म्हणून महापालिकेच्या मालकीच्या झोपडपट्टी व्याप्त भूखंडाचा पुनर्विकासाला मान्यता देण्याचा प्रस्ताव तातडीची बाब म्हणून मंजुरीसाठी महासभेत मांडण्यात आला. यावेळी सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी सदर प्रस्तावाला अग्रक्रम देण्याची मागणी केली. मात्र यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत महापौरांना मतदान घेण्यासाठी भाग पाडले. महापौरांनी प्रस्ताव मंजुरीसाठी अनुकूल म्हटले असता भाजप-शिंदे गटाकडून उपस्थित 58 नगरसेवकांनी प्रस्ताव मंजुरीच्या बाजूने मतदान केले तर विरोधी पक्षाच्या 61 नगरसेवकांनी प्रस्तावाला तातडीच्या कामकाजासाठी मंजुरी देण्यात येऊ नये यासाठी विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून दोन तृतीयांश मतदान होणे अपेक्षित होते. मात्र मतांची जुळवाजुळव करण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याने प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याची माहिती सुधार समिती सदस्य शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी दिली.

भाजप-शिंदे गटात बाचाबाची

वडाळ्यातील शिंदे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांच्या क्षेत्रातील हा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव राखून ठेवावा लागल्याने भाजप आणि शिंदे गटात जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक बाबींमध्ये विषयांमध्ये एकमत नसल्याचेही समोर आले आहे. या प्रस्तावाला शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, विठ्ठल लोकरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध करीत सत्ताधार्यांना धक्का दिला.

Comments are closed.