IPL 2026 – मुंबई इंडियन्ससाठी शेवटची संधी; चेन्नईच्या घरच्या मैदानात पराभवाचा बदला घेण्यासाठी तयार
आयपीएलमध्ये बिग बास समजले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ शनिवारी एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. मुंबई आणि चेन्नई या दोन संघांच्या नावावर सर्वाधिक जेतेपदे असली तरी यंदाच्या मोसमात त्यांची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. मुंबईसाठी हा सामना करो या मरो असाच असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. मुंबईपेक्षा चांगल्या स्थितीत चेन्नईचा संघ आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. चेन्नईचा संघ आपल्या घरच्याच मैदानात खेळणार असल्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. पण या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा खेळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. या दोन्ही संघांतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात मुंबईच्या घरच्या मैदानात चेन्नईने विजय साकारला होता. त्यामुळे आता मुंबई चेन्नईच्या मैदानात जाऊन आपला बदला घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
आयपीएलच्या गुणतालिकेनुसार मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांचे समान आठ सामने झाले आहेत. या आठ सामन्यांमध्ये मुंबईला फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत, तर चेन्नईच्या संघाच्या नावावर तीन विजय आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ हा गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, तर चेन्नईचा संघ हा सहाव्या स्थानावर आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांचे अजून सहा सामने बाकी आहेत. मुंबईने जर सहाच्या सहा सामने जिंकले तर त्यांना बाद फेरीची आशा असेल, तर चेन्नईला किमान पाच सामने तरी जिंकावे लागतील.
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली मुंबईने पहिलाच सामना जिंकून इतिहास रचला होता. पण त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून जी घसरली ती पुन्हा उभीच राहू शकली नाही. हार्दिकने संघात केलेले बदल घातक ठरल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने पहिले तिन्ही सामने गमावले होते, पण त्यानंतर गेल्या पाच सामन्यांत त्यांनी तीन विजय मिळवले आहेत. त्यामुळे चेन्नईचा संघ लयीत येत असल्याचे दिसत आहे.
चेन्नईच्या संघात या वर्षी दाखल झालेल्या संजू सॅमसनने दोन शतके लगावत आपली निवड सार्थ ठरवली आहे. पण फलंदाजीत संजूला अपेक्षित साथ मिळताना दिसत नाही. चेन्नईचा अंशुल पंबोज हा चांगल्या फॉर्मात आहे. सातत्याने विकेट्स मिळवत त्याने आपली निवड सार्थ करून दाखवली आहे. मुंबईकडून क्विंटन डीकॉक आणि रायन रिक्लेटन चांगल्या लयीत दिसत आहेत. या दोघांच्या नावावर शतके आहेत. पण ज्या सामन्यांत या दोघांनी शतके झळकावली होती, त्या सामन्यांत मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत मात्र सातत्य दिसलेले नाही. त्यामुळे मुंबईला जर विजय मिळवायचा असेल तर त्यांना गोलंदाजीत कमाल सुधारणा करावी लागणार आहे.
Comments are closed.