तिरंगा फडकवण्यासाठी ठाण्याचा हर्ष राऊत सज्ज, जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत आज मैदानात उतरणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>>प्रसाद लाड<<

हिंदुस्थानचा तिरंगा फडकवण्यासाठी महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू दाखल झाला आहे तो थेट जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत. घरात अ‍ॅथलेटिक्सचं नावही माहिती नाही, तरीही या पठ्ठय़ाचा संपूर्ण देशात अव्वल क्रमांक आला. ठाण्यात खेळण्यासाठी चांगला ट्रॅकही नाही. पायाभूत सुविधा नसताना हा खेळाडू चक्क हिंदुस्थानचे नाव उंचावण्यासाठी आफ्रिका खंडातील गॅबरॉनमध्ये दाखल झाला आहे आणि डोळय़ात स्वप्न आहे ते हिंदुस्थानला पदक जिंकून द्यायचे. या मराठमोळय़ा खेळाडूचं नाव आहे हर्ष राऊत. देशाकडून 100 बाय 4 मीटर रिले प्रकारात तो हिंदुस्थानचे नेतृत्व करणार आहे.

हर्षबाबत त्याचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी सांगितले की, ‘‘फार कमी वयात हर्षला जागतिक स्पर्धेच्या व्यासपीठावर खेळायला मिळत आहे, हे माझ्यासाठी सुखदायक आहे. अथक मेहनत, खेळातील शिस्त आणि सातत्याच्या जोरावर त्याने हिंदुस्थानच्या संघात स्थान कमावले आहे. हर्ष जर अशीच कामगिरी करत राहीला तर हिंदुस्थानला एक जागतिक दर्जाचा खेळाडू नक्कीच मिळू शकतो. ’’

हिंदुस्थानच्या संघात संधी मिळाल्यानंतर हर्ष म्हणाला की, ‘हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव कसे उंचावता येईल, यासाठी मी प्रयत्नशील असेन.’

आनंद राऊतची आतापर्यंतची कामगिरी..

हर्ष हा जागतिक स्पर्धेत निवडण्यात आलेला मुंबईतील एकमेव खेळाडू आहे. देशामध्ये 23 वर्षांखालील गटात हर्षचा अव्वल क्रमांक आहे. हर्षने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत आपली चुणूक दाखवली आहे. 2023 साली रौप्यपदक, तर 2024 मध्ये कांस्यपदक त्याने पटकावलं. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. गेल्या वर्षी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत तर त्याने तर दोन पदकांची कमाई केली. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने 10.35 सेकंदांचा आपला नवा राष्ट्रीय विक्रमही रचला आहे. हिंदुस्थानच्या संघात सर्वात लहान पण आश्वासक खेळाडू म्हणून हर्षकडे पाहिलं जातं.

हर्ष हा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमध्ये सराव करतो. पण तिथे अॅथलेटिक्सचे फक्त दोनच ट्रक आहेत. सराव किंवा स्पर्धेसाठी सहा ट्रकची गरज असते. पण तरीही या परिस्थितीत हर्षने घेतलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे म्हटले जात आहे.

Comments are closed.