कामाची बिले अन् डिपॉझिटसाठी 6 टक्के कमिशन मागणं भोवलं; बदलापूर नगर परिषदेच्या ‘क्लास-1’ अधिकाऱ्
बदलापूर लाच बातम्या: बदलापूरमधून (Badlapur) एक मोठी बातमी समोर येत आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील (Kulgaon-Badlapur Municipal Council) भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण उघडकीस आलं असून, कंत्राटदाराकडून 6 टक्के कमिशनची मागणी करणाऱ्या लेखाधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून विकास वैजीनाथ चव्हाण (52) (Vikas Chavan) असे गुन्हा दाखल झालेल्या वर्ग-1 च्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
Badlapur Bribe News: काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांची ‘नवनिर्माण इंटरप्रायजेस’ नावाची कंपनी असून त्यांना बदलापूर नगर परिषदेच्या 77 रस्ते कामांचे कंत्राट मिळाले आहे. यातील पूर्ण झालेल्या कामांचे 17 लाख 44 हजार रुपयांचे बिल आणि जुन्या कामांची 4 लाख 99 हजार रुपयांची सुरक्षा ठेव (Security Deposit), अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाली होती. ही रक्कम खात्यावर जमा केल्याचा ‘मोबदला’ म्हणून लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी एकूण रक्कमेच्या 6 टक्के म्हणजेच 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
Badlapur Bribe News: एसीबीचा तपास आणि गुन्हा दाखल
या प्रकरणी तक्रारदाराने 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई एसीबीकडे धाव घेतली होती. 10 डिसेंबर रोजी झालेल्या पडताळणीत चव्हाण यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या अर्जाची सखोल चौकशी करण्यात आली. अखेर 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये विकास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Badlapur Bribe News: मोठे अधिकारी अडकण्याची शक्यता
विकास चव्हाण हे ठाण्यातील समता नगर भागात राहणारे वर्ग-1 चे अधिकारी आहेत. नगर परिषदेत बिले मंजूर करण्यासाठी ‘टक्केवारी’ ठरलेली असते का? आणि या लाचेच्या रकमेत आणखी कोणा बड्या अधिकाऱ्यांचा हिस्सा होता का? या दिशेने आता एसीबी तपास करत आहे. यामुळे नगर परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आणखी काही वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.