टी–20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा महिला संघ जाहीर, पाकिस्तानशी होणार पहिला सामना
इंग्लंडमध्ये जून-जुलै महिन्यांमध्ये होणाऱ्या आगामी महिला टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानने आपला संघ जाहीर केला आहे. हिंदुस्थानचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे कायम ठेवण्यात आले आहे, तर स्मृती मानधना ही उपकर्णधारपदी असणार आहे. हिंदुस्थानचा टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या टी-20 वर्ल्ड कपच्या संघात यास्तिका भाटिया, नंदनी शर्मा आणि राधा यादव यांची निवड केली आहे. या तिन्ही खेळाडू अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी नव्हत्या.
हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेची सुरुवात 14 जून रोजी बर्मिंगहॅम येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल. हिंदुस्थानने अद्याप टी-20 विश्वचषक जिंकलेला नाही, मात्र सध्याचा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वविजेता किताब हिंदुस्थानकडे आहे.
महिला टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ:
हरमनप्रीत काwर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्री चरणी, श्रेयंका पाटील, भारती फुलमाळी, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), नंदनी शर्मा, राधा यादव.
Comments are closed.