बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसताच घोषणा, प्रत्यक्षात मदत नाहीत

ठाणे : कोणतीही घटना घडल्यानंतर तातडीने आश्वासनं देणाऱ्या सरकारला काही वेळानंतर त्यांच्याच आश्वासनांचा विसर पडतोय की काय असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. बदलापूरमधील एका शाळेत अत्याचार झालेल्या चिमुकलीची फी शासनाने अद्याप भरलीच नाही. तसेच त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देखील दिलं गेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर शासनाने फक्त घोषणाच केल्या, प्रत्यक्षात मदत काहीच केली नाही. त्यामुळे पीडित चिमुकलीच्या वडिलांनी नाराजीजी व्यक्त केली आहे.

बदलापूरमध्ये दोन वर्षांपूर्वी एका नामांकित शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यानंतर या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च शासनाकडून केला जाईल आणि मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य केलं जाईल, असं आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं होतं. मात्र दोन वर्षात शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून फी सुद्धा शासनाने भरली नसल्याचं पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं. याबाबत त्यांनी शासनावर नाराजीही व्यक्त केली.

पीडित चिमुकली ही आता दुसऱ्या एका खासगी शाळेत शिकत असून यावर्षी ती पहिलीला जाणार आहे. तिची मागच्या वर्षीची फी मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी भरली होती. तर आता पहिलीची फी भरण्यासाठी शाळेकडून विचारणा झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावर आम्हाला अद्याप शासनाकडून याबाबत ऑर्डरच आलेली नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. त्यामुळे शासनाच्या लालफितीच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

चिमुकलीच्या कुटुंबीयांच्या नाराजीनंतर आता तरी शासन याबाबत गांभीर्याने निर्णय घेतं का हे पाहावं लागेल.

Badlapur Crime Case : बदलापूरची घटना नेमकी काय?

बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट 2024 रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर 13 ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. नंतर या प्रकरणी लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. त्यावेळी संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली.

ही बातमी वाचा:

बदलापूर शाळेचा गुन्हा,
बदलापूर गुन्हे प्रकरण,
अक्षय शिंदे न्यूज,
अक्षय शिंदे एन्काउंटर,
बदलापूर अक्षय शिंदे एन्काउंटर,
अक्षय शिंदे प्रकरण,
अक्षय शिंदे एन्काउंटर मराठी,

आणखी वाचा

Comments are closed.