तलाठी भरती आता एमपीएससी घेणार, 1700 पदांसाठी प्रक्रिया सुरू
गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. आता तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तब्बल 1700 तलाठी पदांची भरती एमपीएससीकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे.
महसूल विभागाने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती असल्याचे समजते. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र ही भरती एमपीएससीकडून होणार आहे.
यापूर्वी 2023 मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 4466 जागांसाठी दहा लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते.
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. 2.04.2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आपृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतिबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे.
Comments are closed.