आमच्या अधिकाऱ्यांवर हिंदी लादली, तर…! मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारला इशारा, असी
मुंबई : राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. भाषा संचालनालयाने 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं या परीक्षेचं आयोजन केलं आहे. मात्र, राज्यात मराठी भाषा सक्तीची असताना हिंदी परीक्षेचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल मराठी भाषा अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच या निर्णयावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी संताप व्यक्त करत अशा पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार असा इशारा दिला आहे.
Sandeep Deshpande: आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर…
संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काल राज्य शासनाने राजपत्रित आणि राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे. एकीकडे आपण मराठी भाषा बोलली पाहिजे यासाठी आग्रही आहे, महाराष्ट्राची राजभाषा मराठीच असली पाहिजे, अशा पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार आहे. जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल त्याला राज्य शासन जबाबदार असेल, जाणीवपूर्वक दिल्लीत बसलेल्या भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असंही देशपांडे पुढे म्हणालेत.
Sandeep Deshpande: जाणीवपूर्वक दिल्लीतील भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू
अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याच राज्य सरकारने उत्तर द्यावं. पडद्याआडून हिंदी भाषा सक्तीचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. जाणीवपूर्वक दिल्लीतील भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, पडद्याआडून हिंदी सक्ती लागू करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचा अजेंडा आहे, हिंदू हिंदी हिंदुस्तान आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असंही पुढे देशपांडेंनी म्हटलं आहे.
Sandeep Deshpande: असीम सरोदेंसारख्या माणसाला कळणार नाही
तर नसरापूर प्रकरणी चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या (Nasrapur Girl Death) आपल्या सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवणारे वक्तव्य केलं. राज ठाकरेंसारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य चुकीचं आहे. पोलिसांनी त्यांना समज द्यावी असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं, असीम सरोदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही बोललो ते बोललो सरोदेंना जे काही करायचं ते करावं, शक्ती कायद्याची अंमलबजावणी सरकार कधी करणार? सरकार संवेदनशील नाही म्हणून असे प्रकार घडतायेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही. हे असीम सरोदेंसारख्या माणसाला कळणार नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.