नागपुरात भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांवर भिरकावले दगड
नागपूर बातम्या : भर वाहतुकीत वर्दळीच्या ठिकाणी भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एकमेकांवर दगड भिरकावल्याने तिथून जाणाऱ्या वाहन चालकांची सुरक्षितता धोक्यात आली होती. नागपुरातील कस्तुरचंद पार्क जवळ एलआयसी चौकावर आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. या तुफानी हाणामारीमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काही क्षणांतच वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत
संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास एलआयसी चौकातील सिग्नलवर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची गर्दी होती. याचदरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठमोठे दगड फेकण्यास सुरुवात केली. तसेच लाकडी काठ्यांनी एकमेकांवर हल्ले चढवले. या प्रकारामुळे तिथून जाणारे वाहनचालक आणि नागरिक भयभीत झाले. सुदैवाने कोणत्याही नागरिकाला दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही गटांतील काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. उपस्थित नागरिकांकडून घटनेची माहिती तात्काळ सदर पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांना त्वरीत घटनास्थळी पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, बराच वेळ पोलिस पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागपूर शहरात भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली
दरम्यान, नागपूर शहरात भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ट्रॅफिक सिग्नलवर जबरदस्तीने भीक मागणे, पैसे न दिल्यास शिवीगाळ करणे, वाहनांच्या बोनटवर बसणे असे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त आहे.
उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला
उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. नागेशचा मेव्हणा शकील खान याने कौटुंबिक वादातून कॅप नंबर 5 च्या पेट्रोल पंपावर हा हल्ला केला. नागेश हा पेट्रोल पंपावर काम करतो. ड्युटी संपवून नागेश हा घरी निघाला होता. त्याच वेळेस त्याचा मेव्हणा शकील हा अरबाज खान या आपल्या साथीदार अरबाज खान सोबत आला आणि त्याने सोबत आणलेला चाकू नागेशच्या पोटात खुपसला. दरम्यान या हल्ल्यानंतर नागेशला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपिंना अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.