पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल लांबणीवर, सुनावणी 16 जूनपर्यंत सुनावणी तहकूब; नेमकं कारण काय?

पवनराजे निंबाळकर प्रकरण: राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Case) बहुप्रतीक्षित निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) तसेच आरोपी पवन शुक्ला हे प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामी, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता 16 जूनपर्यंत तहकूब केली असून, त्या दिवशी सर्व आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत.

Pawanraje Nimbalkar Case: नेमके काय आहे प्रकरण?

3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून धाराशिवला जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांची आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून हा गोळीबार केला होता. राजकीय वैरातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा सीबीआयने केला असून, यासाठी 25 लाखांची सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे.

Pawanraje Nimbalkar Case: 18 वर्षांचा प्रदीर्घ लढा

या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. 2009 मध्ये सीबीआयने याप्रकरणी पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती, मात्र सप्टेंबर 2009 पासून ते जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपी आहेत. यामध्ये शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन यांचा समावेश आहे.

Pawanraje Nimbalkar Case: निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे चुलत भाऊ असूनही त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व या हत्येचे मुख्य कारण असल्याचे तपासात समोर आले होते. आता 16 जून रोजी न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेणार? यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

कोण आहेत पद्मसिंह पाटील? (Who is Padamsinh Patil?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे पद्मसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी मानले जातात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. उस्मानाबाद मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गृह, सिंचन आणि ऊर्जा मंत्री म्हणून कॅबिनेट पद भूषवले आहे.

मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर अनेक वादांचे सावटही राहिले. 2006 मध्ये काँग्रेसचे नेते आणि त्यांचे चुलतभाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. निंबाळकर हे उस्मानाबादमधील त्यांच्या राजकीय आणि सहकारी संस्थांच्या कामकाजात सक्रिय होते. याआधी 2005 मध्ये भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उघड केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळेही पद्मसिंह पाटील चर्चेत आले होते. पी. बी. सावंत समितीने त्यांच्यावर कारगिल युद्ध आणि गुजरात भूकंपग्रस्तांसाठी असलेल्या तेरणा साखर सहकारी संस्थेच्या निधीतील गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांचा पैसा अपहार केल्याचे आरोप ठेवले होते.

आणखी वाचा

Devendra Fadnavis: पुढील सहा महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही; बुलेटवरून विधानभवनात पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सगळंच सांगितलं, विरोधकांना सुनावले खडेबोल

आणखी वाचा

Comments are closed.