मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा राजीनामा; विधानपरिषदेनंतर नाराजी, कुठ जाणार?
ठाणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय (NCP) अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तसेच, राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदीही त्यांनी पदभार स्वीकारला आहे. अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं काम त्यांच्याकडून सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वेगळंच राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिलत टकरेंनी शरद पवारांचे भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे समन्वयक आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा कळवला.
आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा दुसरा धक्का बसला आहे. प्रवक्ता, ठाणे समन्वयक आणि महाराष्ट्र सरचिटणीस पदासोबतच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. ”मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे, तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती”, अशा 4 ओळीच्या आशयात आनंद परांजपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, आनंद परांजपे आता कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असून ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे समजते.
नुकतेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत मोठी चढाओढ लागली होती. त्यामध्ये, अखेर झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची आमदरकी दिली. त्यामुळे, आनंद परांजपे हे नाराज असल्याची चर्च होती, मागील काही दिवसांपासून ते नाराज होते. विधान परिषद, राज्यसभा अशा दोन्ही निवडणुकांवेळी त्यांना नाकारण्यात आले होते, त्याच पार्श्वभूमीवीर अखेर आज त्यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंची घेतली भेट
आनंद परांजपे हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे, त्यांनी गेल्या काही दिवसात 2 वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे, ते पुन्हा शिवसेनावापसी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण, राज्यात शिवसेना एकसंघ असताना त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, परांजपे कुठे जाणार याबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही, तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे पालघर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.