NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फि

NEET परीक्षेचा पेपर लीक: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे  (NEET Exam Paper Leak) धागेदोरे आता अधिक गडद होत चालले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी नाशिकचा शुभम खैरनार (Shubham Khairnar) याला सीबीआयने (CBI) अटक केल्यानंतर आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांत शुभम खैरनार याच्याशी प्रत्यक्ष, सोशल मीडिया किंवा दूरध्वनीद्वारे (Phone Calls) सातत्याने संपर्क साधणारे सर्व जण आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.

NEET Exam Paper Leak: सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सची तपासणी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम खैरनार याच्या संशयास्पद हालचालींची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआय त्याच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची सखोल तपासणी करणार आहे. शुभमच्या कार्यालयात किंवा घरी नेमके कोण-कोण लोक भेटायला येत होते, याचा सुगावा यातून लागणार आहे. याशिवाय, गेल्या काही महिन्यांपासून शुभम खैरनार याच्याशी प्रत्यक्ष सोशल मीडिया आणि दूरध्वनीद्वारे सातत्याने किंवा संशयास्पदरित्या संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NEET Exam Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयचे छापे

दुसरीकडे, नीट पेपरफुटीचे कनेक्शन पुन्हा एकदा लातूरमध्ये पोहोचले आहे. सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी पहाटे 6 वाजल्यापासून लातूर शहरातील सुतमील परिसरात एका खाजगी ट्युशन चालकाच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी घराची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ट्युशन चालकाचे मोबाईल फोन, संगणक हार्ड डिस्क आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

NEET Exam Paper Leak: प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात

तर लातूरमधील माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर येत आहे. रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. त्यांना आज दिल्लीत न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. पी. व्ही. कुलकर्णी हे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेले रसायनशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश होता. या प्रवेशाचा गैरवापर करून त्यांनी पेपरफुटी घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. कुलकर्णी हे एनटीएसोबत जोडले गेले होते आणि त्यांनीच प्रश्नपत्रिका लीक केल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगितले जात आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना एकत्र केले होते. तसेच, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरे पाठ करण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. दरम्यान, पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्या संपर्कातही कुलकर्णी असल्याचे समोर आले आहे. याच धाग्यांवरून तपास आणि चौकशी करत सीबीआयने ही कारवाई केली. आतापर्यंत या प्रकरणात देशभरातून आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

NEET Exam Paper Leak: 21 जूनला होणार पुनर्परीक्षा

दरम्यान, 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून, 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा (Re-Exam) घेतली जाणार आहे. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र, सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे आता लातूर आणि नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील माफियांचे धाबे दणाणले आहेत.

आणखी वाचा

NEET Paper Leak Case : स्वतः ला डॉक्टर म्हणून मिरवायचा, मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळायचा, सूत्रधार शुभम खैरनारचा धक्कादायक कारनामा उघड

आणखी वाचा

Comments are closed.