जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला
अशोक खरात क्राईम न्यूज: दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणारा नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) हा सध्या पोलिसांच्या कोठडीत असून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) देखील रडारवर आहे. एकाबाजूला खरात पोलीस कोठडीची हवा खात असताना, दुसरीकडे मात्र जेलमध्ये बसून त्याची आर्थिक कमाई सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका मोठ्या प्रकल्पासाठी खरात कुटुंबाची जमीन संपादित केली जाणार असून, त्या बदल्यात त्याला तब्बल 3 कोटी रुपयांचा सरकारी मोबदला मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना गंडा घालणाऱ्या या भोंदूबाबाची गुंतवणुकीची विद्या चांगलीच फळाला आल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगली आहे.
Ashok Kharat Crime news: कुंभमेळा रिंगरोड प्रकल्पातून मोठी रक्कम
नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कुंभमेळा रिंग रोड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनी जात आहेत. या भूसंपादनाच्या मोबदल्यात खरात कुटुंबाला सुमारे तीन कोटी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ashok Kharat Crime news: खरात आणि त्याच्या कुटुंबीयांना मिळणारा मोबदला पुढीलप्रमाणे
– गवळणे शिवारातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातला 82 लाख 83 हजार रुपये मिळतील.
– पाथर्डी शिवारातील भूसंपादनापोटी खरातच्या दोन्ही मुली, म्हणजेच तृप्तबाला आणि सृष्टी खरात यांना 1 कोटी 82 लाख रुपये मिळणार आहेत.
Ashok Kharat Crime news: निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीलाही लाखो रुपये
या भूसंपादन प्रक्रियेत केवळ खरात कुटुंबच नाही, तर यापूर्वी वादात सापडलेले आणि सध्या निलंबित असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीचे नावही समोर आले आहे. खरातच्या या जमीन व्यवहारांशी संबंधित प्रक्रियेत भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Ashok Kharat Crime news: खरेदी प्रक्रियेसाठी मुली लावणार हजेरी?
अशोक खरात हा सध्या गंभीर गुन्ह्याखाली पोलीस कोठडीत असल्याने, शासकीय खरेदी प्रक्रियेच्या वेळी तो प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र, या भूसंपादनाचा आणि करोडोंच्या निधीचा फायदा घेण्यासाठी खरातच्या दोन्ही मुली (तृप्तबाला आणि सृष्टी खरात) खरेदी व्यवहाराच्या वेळी सरकारी कार्यालयात उपस्थित राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महिलांवर अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या खरातला हा सरकारी मोबदला वेळेत मिळतो की तपास यंत्रणा या आर्थिक व्यवहारांवर टाच आणतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.