होय, आम्ही झुरळ! सोलापुरात कॉक्रोच पार्टीचे समर्थक न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर
‘होय, आम्ही झुरळं’ असे म्हणत कॉक्रोच पार्टी समर्थक आज रस्त्यावर उतरले. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणांनी धडक दिली. यावेळी न्यायालय, सरन्यायाधीश सूर्य कांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. सरन्यायाधीशांनी तरुणांना झुरळ संबोधल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने सोलापुरात आज झुरळांची वेशभूषा घालून सरन्यायाधीश व पंतप्रधानांचा निषेध करीत आंदोलन केले. पोलिसांना चकवत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व झुरळाचे छायाचित्र भेट दिले. देशातील कोट्यवधी युवक-युवती आज शिक्षण, रोजगार, महागाई, खासगीकरण, पेपरफुटी आणि असुरक्षित भविष्य या संकटाशी झुंज देत असताना देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून तरुणांची तुलना ‘झुरळा’शी करणे ही संतापजनक, अपमानास्पद आणि असंवेदनशील बाब असल्याचे भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने निवेदनात म्हटले आहे. यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, केंद्रीय समिती सदस्य अॅड. अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरमुरे, अश्विनी मामड्याल, नरेश मुल्लापल्ली, दिनेश बडंगू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तरुणांची माफी मागा
तरुण पिढीच्या स्वाभिमानावर ‘झुरळ’ या शब्दाने घाव घालण्यात आला आहे. देशातील तरुण देशाची ऊर्जा, श्रम, बुद्धिमत्ता आणि भविष्य असून, विद्यार्थी आणि तरुण हेच देशांच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. संबंधित सरन्यायाधीशांनी देशातील तरुणांची जाहीर माफी मागावी, सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, युवकांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या घटनांची गंभीर दखल घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, सरकारने रोजगार, शिक्षण, सामाजिक सुरक्षेबाबत ठोस धोरण जाहीर करावे अशा मागण्या भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने निवेदनाद्वारे केल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर अवघ्या सहा दिवसांत भाजपलाही टाकले मागे
15 मे रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी कॉकरोच टिप्पणी केली होती. त्यानंतर 16 मे रोजी पक्षाची स्थापना करण्यात आली. फक्त सहा दिवसांमध्ये गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पक्षाचे 1.5 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपपेक्षाही जास्त फॉलोअर्स ‘सीजेपी’ला मिळाले आहेत. भाजपचे इन्स्टाग्रामवर 87 लाख फॉलोअर्स आहेत. ‘एक्स’वर ‘सीजेपी’चे 1.93 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.
कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’ खाते ब्लॉक
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तरुण बेरोजगारांसंदर्भात केलेल्या कॉक्रोच टिप्पणीच्या निषेधार्थ अभिजित दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टी स्थापना केली. अवघ्या सहा दिवसांत 1.5 कोटी फॉलोअर्स झाले. या पार्टीचे ‘एक्स’ खाते अचानक ब्लॉक करण्यात आले. तसा स्क्रीनशॉट अभिजित यांनी पोस्ट केला. त्यानंतर काही तासांमध्येच ‘कॉक्रोच इज बॅक’ या नावाने नवे ‘एक्स’ खाते तयार करण्यात आले.
ही कोणत्या प्रकारची लोकशाही?
आमची भीती खरी ठरली. सीजेपीचे ‘एक्स’ खाते हिंदुस्थानात ब्लॉक केले आहे. हिंदुस्थानातील स्थानिक नियम, न्यायालयाचे आदेश याच्या आधारे कारवाई केल्याचे ‘एक्स’ने कळवले. हे खाते बंद का केले, असा प्रश्न विचारला पाहिजे. आम्ही केवळ शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. ही नेमकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, असा सवाल अभिजित दीपके यांनी केला.
अंधभक्तांना नेमकी भीती कशाची आहे?
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘अंधभक्त’ कॉक्रोच जनता पार्टीवर टीका का करत आहेत? नेमकी भीती कशाची आहे? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया केवळ धोरणांमधील पोकळपणा आणि भीतीच दर्शवतात. आपल्या देशात एकेकाळी लोकशाही होती,’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
Comments are closed.