मुलासाठी पैसे देऊन मोटेगावकरकडून पेपर विकत घेतला; सीबीआयची डॉ. मनोज शिरुरेच्या घरी धाड, काय काय

मनोज शिरुरे NEET परीक्षा 2026 पेपर लीक: नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉ. मनोज शिरुरे यांच्या संदर्भातील तपास अधिक तीव्र झाला असून सीबीआयच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी पुन्हा धाड टाकली आहे. काल सकाळी लातूरमध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक अंबाजोगाईकडे रवाना झाले होते.

अंबाजोगाई येथे काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झाले. शिरुरे यांच्या हॉस्पिटललगत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे सापडल्याचे समजते. संबंधित साहित्य सीबीआयने ताब्यात घेत पुढील तपासासाठी सोबत नेले.

मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये चौकशीचे सत्र- (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)

दिवसभरातील तपासातून मिळालेल्या माहितीनंतर सीबीआयचे पथक पुन्हा डॉ. शिरुरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. नव्या लीडच्या आधारे आणखी काही पुरावे किंवा कागदपत्रे मिळतात का, याचा शोध अधिकारी घेत असल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आता अधिक व्यापक होत असून मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये चौकशीचे सत्र सुरू असल्याने या प्रकरणातील नेटवर्क किती मोठे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकाला पहिल्यांदाच अटक- (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)

नीट पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्रातील आतापर्यंत शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काल लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंतच्या कारवाईतील ही पहिली अटक आहे, जी एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली आहे. आतापर्यंत ज्यांनी नीटचा पेपर फोडला, नीटचा पेपर विकला…यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता नीटचा पेपर स्वत:च्या मुलासाठी खरेदी करणाऱ्या पहिल्या पालकाला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण आणखी गडद होत आहे.

कोण आहे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे? (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)

लातूर शहरात NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची कारवाई आणखी वेगाने सुरू असून, RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या नेटवर्कमधील संशयितांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या CBI पथकाने काल संध्याकाळी जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे पोहोचले. हे रुग्णालय बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांचे आहे. फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CBI च्या प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून ते पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

संबंधित बातमी:

Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.