माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी ‘ते’ स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणा

कोकण: राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी (Vidhan Parishad Election 2026) 18 जून रोजी मतदान होणार आहे. ४ जूनला निवडणुकीतून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगवान घडामोडी घडत असतानाच, कोकणच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने (Bal Mane) यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात (District Collector Office) दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी कारवाई करत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या, त्यानंतर आज बाळ माने यांचे दुसऱ्या दिवशी सुद्धा स्टेस्टस चर्चेत आले आहे.

रत्नागिरी-  कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे दुसऱ्या दिवशी सुद्धा स्टेस्टस चर्चेत आले आहे. काळ हा मोठा शिक्षक असल्याचं स्टेस्टस त्यांनी ठेवलं आहे. ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काल देखील बाळ माने यांनी स्टेटस ठेवलं होतं. बाळ माने यांच्या स्टेस्टसचा रोख कुणाकडे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. काल बाळ माने यांच्याकडून विनायक राऊत यांच्यावरती आरोप झाले होते.

Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : आधीचाही स्टेटस चर्चेत

बाळ माने यांनी याआधी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक अत्यंत मार्मिक संदेश पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणाले होते, मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो… त्याचवेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात. शुभ दिवस. Revenge is just a waste of time, असे बाळ माने यांनी म्हटले आहे. बदला घेणे हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, असे सूचक विधान बाळ माने यांनी केले होते.

Who is Bal Mane?: कोण आहेत बाळ माने?

विधानपरिषद निवडणुकीतील या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण राज्यात ‘बाळ माने’ हे नाव प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे.
– बाळ माने हे प्रदीर्घ काळ भारतीय जनता पक्षात (BJP) सक्रिय होते. ते कोकणातील भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते मानले जातात.
– 1999 च्या विधानसभा निवडणुकीत बाळ माने हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.
– 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या जागावाटपात त्यांना उमेदवारी मिळणे कठीण झाल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
– ठाकरे गटाने त्यांना रत्नागिरी मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी दिली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
– पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मान-सन्मान राखत त्यांना पक्षाचे उपनेते पद दिले होते, तसेच आता थेट विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती.

Comments are closed.