भुजबळ कबड्डीचे उत्तम खेळाडू, खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना माहीत : सुनील तटकरे
मुंबई : कार्यक्रम होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापनदिनाचा, मात्र चर्चा झाली ती प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेल्या सुनील तटकरेंची (Sunil Tatkare) आणि त्यांनी मारलेल्या भुजबळांना टोमण्यांची. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे उत्तम कबड्डीपटू आहेत, खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे. कधी ते बोनस गुण घेऊन येतील तर कधी समोरच्यांचे सातही जण घेऊन येतील, असं सुनील तटकरे म्हणाले. छगन भुजबळांचे राजकारण आपल्यापेक्षा कुणाला चांगलं माहिती असू शकतं, असंही सुनील तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक सभागृहात आयोजित सोहळ्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्या भाषणातून पक्षाच्या वाटचालीवर भाष्य केलं. त्याचवेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता, 2019 मधील भाजपसोबत सत्तास्थापनेच्या हालचालींचा दाखला देत त्यांना आव्हान दिलं.
1999 ते 2026 या 27 वर्षांच्या पक्षाच्या प्रवासाचा उल्लेख करताना सुनील तटकरे कमालीचे भावुक झाले होते. आज या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपल्याला अजित दादांची आठवण येते. जरी ते आज व्यासपीठावर दिसत नसले, तरी त्यांनी दिलेल्या विचारांवर आणि ऊर्जेवर आपण सर्व जण पुढे काम करत राहणार आहोत, असं तटकरे म्हणाले.
Sunil Tatkare Challenge to Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर पहिली सही कुणाची?
आमदार रोहित पवार आणि शरद पवार गटाकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना सुनील तटकरे यांनी 2019 मधील एका मोठ्या घडामोडीचा दाखला दिला. ते म्हणाले की, “आज आमच्यावर गद्दारीची आणि भाजपसोबत गेल्याची महायुतीवरून टीका होत आहे. परंतु, 2019 साली अजित दादांच्या शासकीय कार्यालयात पक्षाचे सर्व आमदार एकत्र बसले होते. त्यावेळी ‘आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले पाहिजे’, असं स्पष्ट लिहून सर्व आमदारांनी सह्यांचे पत्र आदरणीय शरद पवार साहेबांना दिलं होतं. आता आमच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांनी आणि टीका करणाऱ्यांनी जरा इतिहास आठवावा. त्या पत्रावर सर्वात पहिली सही कुणी केली होती? तो कागद आता शोधून काढण्याची वेळ आली आहे.”
जर 2019 मध्ये दादांनी घेतलेला तो निर्णय कायम राहिला असता, तर महाराष्ट्राचे आजचे राजकारण पूर्णपणे वेगळे असते, असेही सुनील तटकरे म्हणाले.
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : भुजबळ कबड्डीचे, तर प्रफुल पटेल फुटबॉलचे खेळाडू
आपल्या भाषणात सुनील तटकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची तुलना वेगवेगळ्या खेळाडूंशी केली. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळांना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला. सुनील तटकरे म्हणाले की, “छगन भुजबळ साहेब हे राजकारणातील कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. उत्तम कोपरारक्षक आणि मध्य रक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. खोलवर चढाई कशी करायची, हे भुजबळांशिवाय कुणालाच ठाऊक नाही. कधी बोनस गुण घेऊन येतील, कधी एकाच वेळी सातही जणांना घेऊन येतील. हा 80 वर्षांचा तरुण खेळाडू आता सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला आहे. त्यांच्या शेजारी फुटबॉलपटू प्रफुल पटेल बसले आहेत, तर पलीकडे कुस्तीपटू हसन मुश्रीफ आहेत. ही सर्व तगडी टीम अजित दादांनी तयार केली असून, आम्ही हा संघ नक्की यशस्वी करू.”
2004 CM Post NCP Controversy : 2004 मध्ये आमचा मुख्यमंत्री झाला असता तर…
पक्षाच्या भूतकाळातील राजकीय चुकांवर बोट ठेवत तटकरे म्हणाले की, “2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष बनला होता. काँग्रेस आणि आपण एकत्रित लढलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात बोलण्याचे धारिष्ट्य कुणामध्येच नव्हते, मात्र अजित दादांनी संघर्ष करून काँग्रेसकडून जागा सोडवून घेतल्या होत्या.2004 मध्ये जर आपण मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवले असते तर आज राष्ट्रवादीचे पहिल्या क्रमांकाचे स्थान कुणीच हिरावून घेऊ शकले नसते.”
शेवटी, महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करत, अजित दादांनी अर्थमंत्री म्हणून सभागृहात घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहील आणि या योजनेच्या बळावरच पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा:
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.