पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
धाराशिव : जिल्ह्यातील (Dharashiv) राजकीय वादाचे रुपांतर हत्याप्रकरणात होऊन घडलेल्या घटनेला 20 वर्षे उलटून गेली असून फिर्यादी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुरू असलेला कोर्ट खटला अंतिम टप्प्यात असून आज 16 जून रोजी निकालाची तारीख देण्यात आली होती. मात्र, आणखी काही कमतरता दूर करण्यासाठी आता 20 जून ही नवी तारीख देण्यात आली आहे. आज निकालाची तारीख असल्याने दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर (Om rajenimbalkar) हेही आज न्यायालयात उपस्थित होते. कोर्टाने पुढील तारीख दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आमच्या दोन्ही कुटुंबानी 20 वर्षे 13 दिवस संघर्ष केला आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली. माझी क्षमता होती म्हणून हायकोर्टात रिट दाखल करु शकलो, नंतर सीबीआयचा तपास झाला आणि आरोपी समोर आले. आरोपी समोर आल्यानंतर 20 वर्षे खटल्याची सुनावणी सुरू आहे, आरोपी असणारी लोकं डिले टॅक्टिस करत आहेत, असा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केला आहे. माझा राजकारणातील जन्म त्यामुळेच आहे, कशामुळे राजेसाहेबांना संपवलं? तर याचं कारण पॉलिटिकल आहे. सन 2004 च्या निवडणुकीत माझ्या वडिलांचा पराभव फक्त 484 मतांनी झाला होता, पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा दिला अशा आशयाचे खोटे पत्र वर्तमानपत्रातात छापलं होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको, या भावनेतून पवनराजे साहेब आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती. शांत डोक्याने केलेली ही पूर्वनियोजित हत्या आहे, असेही ओमराजे यांनी म्हटलं.
हत्या केल्याने विरोधक संपत नसतो
न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे. अशा पद्धतीने एका माणसाचा खून केल्यावर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तो विरोधक तयार होत असतो, याच जिद्दीने मला इथवर आणलं, माझा राजकीय जन्मच त्यातून झाला. धाराशिव मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. ज्यासाठी आमचा परिवार जगतो, पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांना न्याय मिळावा. त्यामुळे, सध्या डोक्यात एकच आहे, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल लवकर लागावा, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case)
दरम्यान, 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.