ऑपरेशन टायगरला वेग? ठाकरेंचे 6 खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत, एकनाथ शिंदेही दिल्लीकडे रवाना
मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला नऊ पैकी फक्त चारच खासदार उपस्थित असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता ठाकरेंचे सहा खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदेही दिल्लीकडे रवाना झाले असून बुधवारी सकाळी ते या खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
नांदेड विमानतळावरून संध्याकाळी 7.30 वाजता चार्टर्ड विमान दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख याच्यासह सहा खासदार त्यामध्ये असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार हे नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जातंय.
ठाकरेंचे हे सहा खासदार नॉट रिचेबल असून ते बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ते आपल्या पाठिंब्याचे पत्रही देणार असल्याची माहिती आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राज्यातही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. त्यात 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये पाच खासदार अनुपस्थित होते. संजय जाधव हे परभणीमध्ये धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील अनुपस्थित होते.
संजय जाधवांना मंत्रिपदाचं आश्वासन?
परभणीचे खासदार संजय जाधव हे आधीपासून नाराज असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोठा निधीही देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्याचेवळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा निधी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. त्याचसोबत 2029 साली त्यांना तिकीट देऊन पुन्हा खासदार करण्याचा शब्दही दिल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे ओमराजे निंबाळकर यांचेही नाव ऑपरेशन टायगरच्या यादीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचे प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्या मामांच्या कंपनीचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना दिल्याची माहिती आहे. तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा:
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.