शिंदेंच्या आमदाराचा स्फोटक दावा, उद्धव ठाकरेंकडे फक्त एकच खासदार उरणार, अनिल देसाई की अरविंद सा
नागपूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं होतं. एकीकडे अशा बातम्यांना उधाण आलं असतानाच, शिवसेना (UBT) पक्षाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र ‘खासदार फुटी’च्या बातम्यांना बळ देणारं ठरलं आहे. रविवारपासून या चर्चांनी जोर धरला होता तर या पक्षप्रवेशावरती आता शिक्कामोर्तब झालं आहे. या घडामोडीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा दावा केला आहे.
Narendra Bhondekar : अरविंद सावंत उरतील की अनिल देसाई?
एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक सोडून सर्व लोकसभा खासदार आमच्याकडे येतील असा मोठा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारा लोकसभेचा तो एक खासदार नेमका कोण?? तिथे अरविंद सावंत उरतील की अनिल देसाई याचे उत्तर त्यांनी दिले नाही. आजच सर्व 8 खासदार येतील असे नाही. मात्र, लवकरच शिवसेना ठाकरे गटाच्या 9 लोकसभा खासदार पैकी 8 खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होतील असा दावा भोंडेकर यांनी केला आहे, त्यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.
Narendra Bhondekar : ठाकरे गटाच्या नेत्यांनी खरी स्थिती लक्षात घेतली पाहिजे
पुढे बोलताना भोंडेकर म्हणाले की, खासदार आमदारांच्या अडचणी काय हे ठाकरे गटात कोणीही समजून घेत नाही. तसे केले असते तर आज ही वेळ आली नसती असेही भोंडेकर म्हणाले. खासदारांना आमिष दाखवले, काही तरी दिले असे आरोप करणे सोपे आहे, मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांनी खरी स्थिती लक्षात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे एकटे दोषी नाही, तर त्यांची टीम जास्त दोषी आहे असा आरोपही भोंडेकर यांनी केला. ठाकरे गटात लोकप्रतिनिधींना मोकळीक नाही स्वातंत्र्य नाही नेत्याशी भेटण्याची संधी नाही आणि याची अगदी विपरीत परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि हे सर्व निवडून आलेल्या आमदार खासदारांना दिसतय असे भोंडेकर म्हणाले.
Narendra Bhondekar : केंद्रात मोदी सरकारला वाढीव शक्ती…
लवकरच राज्यातील अनेक आमदार सुद्धा आमच्या पक्षात येतील, आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही भोंडेकर यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्रात मोदी सरकारला वाढीव शक्ती दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना बक्षीस मिळेल का ते मुख्यमंत्री होतील का याचा थेट उत्तर देणे त्यांनी टाळलं.एकनाथ शिंदे सर्वांच्या समन्वयाने मुख्यमंत्री होतील असा दावा मात्र त्यांनी केला.
Shivsena UBT MPs: उद्धवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर
उद्धवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर पोहचल्याची चर्चा राजधानीत रंगली असून, उद्धवसेनेच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र, बिर्ला यांनी अद्याप कुणालाही भेटीची वेळ दिली नसल्याची माहिती आहे. काही खासदार दिल्लीत पोहोचल्याने ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आहे. उद्धवसेनेतील सहा खासदारांच्या बंडखोर गटाचे नेतृत्व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर करीत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. आष्टीकर यांनीच बिर्ला यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे समजते. दक्षिण मुंबईचे खासदार अनिल देसाई हेही सध्या दिल्लीत असून त्यांनीही बिर्ला यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे कळते.
राजकीय हालचालींना वेग आला असतानाच संजय राऊत यांनी एका एका खासदाराला १५ कोटी रुपये दिले जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली. यामुळे शिवसेना फुटीच्या चर्चेला बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली होती.
Shivsena UBT MP: काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Comments are closed.