शुबमन गिलची मोठी कामगिरी! 'या' खास बाबतीत रोहित शर्माच्या बरोबरीत
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेत टीम इंडियाने तिसरा सामना ९ गडी राखून सहज जिंकला. चेन्नईत झालेल्या या तिसऱ्या सामन्यात, भारताने अफगाणिस्तानला २१८ धावांत सर्वबाद केले आणि त्यानंतर केवळ एका गड्याच्या मोबदल्यात २८.४ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले. या पाठलागात यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावले. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिलाच एकदिवसीय मालिका विजय ठरला. संपूर्ण मालिकेत गिल उत्कृष्ट लयीत होता. त्याने ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार पटकावला आणि रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुबमन गिलला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तरीही त्याने पहिल्या दोन सामन्यांत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. धर्मशाला येथील पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ८४ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यात १५४ धावा करत शानदार शतक ठोकले. या दोन्ही सामन्यांत त्याने ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कारही जिंकला. गिलने या मालिकेत २३८ च्या सरासरीने एकूण २३८ धावा केल्या, ज्यामध्ये ३३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार मिळाला. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सहावी वेळ होती. यासह, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत गिलने रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर असून त्याने १५ वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार जिंकला आहे.
भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ (मालिकावीर) पुरस्कार जिंकणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर – १५
विराट कोहली – ११
सौरव गांगुली – ७
युवराज सिंग – ७
एम.एस. धोनी – ७
रोहित शर्मा – ६
शुभमन गिल – ६
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करून, भारतीय संघाने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मात्र, जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यांची खरी कसोटी लागणार आहे. या दौऱ्यात गिलची फलंदाजी आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Comments are closed.