राहुल नार्वेकरांनी ‘त्या’ कागदातून भेळ खाल्ली होती का? आशाताईंच्या शोकप्रस्ताव वाचनावरुन संताप

मुंबई : आपल्या सदाबहार गाण्यांनी अजरामर ठरलेल्या गानसम्राजी पद्मविभूषण आशाताई भोसले (आशा भोसले) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. देशभरातून आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर विधिमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन होत असल्याने विधानसभा सभागृहातही त्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तो वाचून दाखवली. मात्र, तो शोकप्रस्ताव वाचताना त्यांच्याकडून झालेल्या चुकीच्या उल्लेख आणि उच्चारावरुन मनसेप्रमुख राज ठाकरेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? अशा शब्दात राज ठाकरे संतप्त भावना बोलून दाखवल्या.

आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही.  बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावला.

शोक प्रस्तावावेळी सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की. त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही? सभागृहात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं, अशा शब्दात राज ठाकरेंनी फडणवीसांनाही लक्ष्य केलं. तसेच, फडणवीसांचं म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला, अशी खंतच राज यांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत  का नाही? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला आहे.

एकनाथ शिंदेंचं विमान 50 हजार फुटावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.

हेही वाचा

Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Comments are closed.