चेतन-सियाने डिलीट केलेले ‘ते’ चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्

केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: लोणावळा जवळील लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) दरीत ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case) आता रोज नवनवे आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) तसेच तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) हे दोघे मोबाईलवर संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषा (Code Language) आणि टोपण नावांचा (Nickname) वापर करत असल्याचे उघड झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर (Recovered Data) केला आहे. या सांकेतिक संभाषणाची पडताळणी करण्यासाठी दोघांची समोरासमोर चौकशी करण्याकरिता पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

18 जून रोजी केतन अग्रवालचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या केल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) सिया आणि चेतनला अटक केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकारी मनोज पवार यांनी तपासातील प्रगती न्यायालयासमोर मांडली.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सरकारी वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद

दोन्ही आरोपींचे एकूण तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सरकारी वकील राजश्री वीरकुड यांनी न्यायालयात सांगितले की, “मोबाईलमधून रिकव्हर केलेल्या डेटामध्ये आरोपींनी सांकेतिक भाषेत संभाषण केल्याचे निदर्शनास आले आहे. या सांकेतिक शब्दांचा अर्थ आणि गुन्ह्याच्या कटाशी असलेला त्यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी दोघांची समोरासमोर चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे.” दुसरीकडे, तांत्रिक तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असा प्रतिवाद बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: कटाची माहिती चेतनच्या मित्रालाही होती?

या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या संपर्कातील काही तरुणांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येच्या कटाची माहिती चेतन चौधरीच्या एका वर्गमित्राला आधीपासूनच होती. हा तरुण बीडचा (Beed) रहिवासी असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे, केतनचा जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी या मित्राने चेतन आणि सिया या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर येत आहे. या मित्राकडून पोलिसांना आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: संमतीविना नार्को चाचणी नाही

सुनावणी दरम्यान दोन्ही आरोपींची नार्को चाचणी (Narco Test) करण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींच्या संमतीशिवाय नार्को चाचणी घेता येणार नाही. त्यानंतर सरकारी वकिलांनीही या टप्प्यावर नार्को चाचणीची आवश्यकता नसल्याचे सांगितल्याने नार्को चाचणीचा विषय सध्या तरी निकालात निघाला आहे. मात्र, केतन अग्रवाल प्रकरणात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Case : सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; सिया-चेतन यांंच्या पहिल्या भेटीचा अन् ‘दिवाळी पार्टी कनेक्शन’चा तपास, पोलिसांनी कोर्टात मांडला महत्त्वाचा पुरावा

Comments are closed.