Jalna crime news – किरकोळ वादातून सराईतांचा गोळीबार; दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तिघे फरार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका किरकोळ वादाचे पर्यावसन गोळीबारात झाले. सराईत गुन्हेगारांनी गावात येऊन गावठी कट्ट्यातून हवेत तब्बल पाच वेळा गोळीबार केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गावकऱ्यांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे पाच पैकी दोन गुन्हेगारांनापकडण्यात यश आले असून, तिघे जण फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पृथ्वीराज संतोष चव्हाण याला मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी करण्यासाठी राजकुमार कांतीलाल भोसले व पृथ्वीराज चव्हाण (दोघे रा. वजीरखेडा, ह.मु. हसनाबाद) यांच्यासह त्यांचे इतर तीन साथीदार भोकरदन येथे आले होते. भोकरदन-हसनाबाद रस्त्यावरील हॉटेलमध्ये पार्टी करून संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे पाचही जण दोन मोटारसायकलवरून हसनाबादकडे परत जात होते.

यादरम्यान, कुंभारी गावाजवळ रस्त्याने जात असताना त्यांनी हुल्लडबाजी करत गावातील 1-2 जणांच्या अंगावर मोटारसायकल घालून कट मारला. आरोपींच्या या हुल्लडबाजीमुळे कुंभारी येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी त्यांना जाब विचारत रस्त्यात रोखले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार वाद झाला. ग्रामस्थांनी हटकल्याचा राग मनात धरून हे तरुण तेथून निघून गेले, मात्र सुमारे एका तासानंतर घातक शस्त्र घेऊन पुन्हा कुंभारी गावात परतले. ज्या ग्रामस्थांनी वाद घातला होता, त्यांना लक्ष्य करत आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण याने आपल्याजवळील गावठी कट्ट्यातून हवेत पाच वेळा गोळ्या झाडल्या. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मोठे हत्यार घेऊन मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानेच आले होते.

गोळीबाराच्या आवाजाने गावात घबराट पसरली असली, तरी कुंभारी येथील तरुणांनी आणि गावकऱ्यांनी मागे न हटता मोठ्या हिमतीने आरोपींचा पाठलाग केला. गावातील अंकुश फकीरबा सहाने या तरुणाने जीवाची परवा न करता मुख्य आरोपी पृथ्वीराज चव्हाण याला झडप घालून पकडले. गावकऱ्यांनी त्याचा गावठी कट्टा हस्तगत केला. या गोंधळात पाचपैकी तिघे जण दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले, तर दोघांना गावकऱ्यांनी चोप देऊन भोकरदन पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. नितीन कटेकर यांनी तातडीने कुंभारी येथील घटनास्थळाला भेट दिली. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून, पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीबाराची रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. जखमी आरोपींना उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.