शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक त्यांनी घेतली. विशेष म्हणजे, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी ही बैठक घेतली, त्यावेळी, एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, या भेटीनंतर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नाराजी व्यक्त केली. ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते, असे राऊत यांनी म्हटले. त्यानंतर, आता एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते. आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवार यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनात तुम्ही येता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आता, या टीकेवर शिवसेना शिंदे गटातून पलटवार केला जात आहे. स्वत: एकनाथ शिंदेनी देखील राऊत यांच्यावर टीका करत उत्तर दिले.

”शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता, यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल… मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल… त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत, तेथे त्यांनी जावे आणि उपचार करून घ्यावे,” असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला.  तसेच, हा एकप्रकारे कद्दूपणा झालांय, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असेही शिंदेंनी म्हटले.

जयंत पाटलांसाठी आम्ही शिवसेनेत जागा करू शकतो

शरद पवार यांचे स्वागत एकनाथ शिंदेंनी केलं, राऊत बोलतात त्याला फार महत्व देऊ नका, राजकारणात कोणी कोणाचं शत्रू नसतं, उद्या उद्धव ठाकरे जरी आले तरी आम्ही त्यांचं खुल्या मनानं स्वागत करू, राजकारणात काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रताप सरनाईक यांनी दिलीय. तसेच, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. आताच एकनाथ शिंदेंच्या कॅबिनेटला सुनिल तटकरे आणि जयंत पाटील बसले होते. तटकरे गेल्यानंतर मी जयंत पाटील यांना शिवसेनेची तुमची जवळीकता जास्त आहे. तुमच्यासाठी आम्ही आमच्याकडे जागा करू शकतो असे म्हटले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं असे सूचक वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना केले.

हेही वाचा

मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Comments are closed.