ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प

आदित्य ठाकरे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Shivsena UBT) दिल्लीतून एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या 6 बंडखोर खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणावर आता शिक्कामोर्तब झाले असून, यामुळे उद्धव ठाकरेंचे हे 6 खासदार आता कायदेशीररित्या शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत. या मोठ्या राजकीय घडामोडीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे काय म्हणाले?

लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “काही वेगळी अपेक्षा होती का? आम्ही हाच अन्याय झेलत आहोत आणि हे पूर्ण देश पाहत आहे. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले, तेच आज संपूर्ण देशासोबत घडत आहे,” असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

मराठी: एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, या कायदेशीर मान्यतेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “ज्या जनतेने या खासदारांना निवडून दिले आहे, त्यांची विकासकामे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत आलेल्या या 6 खासदारांनी केवळ आणि केवळ आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांच्या मतदारसंघाच्या प्रलंबित कामांसाठी मोठा विकासनिधी दिला जाईल.”

Shivsena Operation Tiger: नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या 6 खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये  ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय दिना पाटील (मुंबई दक्षिण-ईशान्य), संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) या खासदारांचा समावेश आहे.

या सहाही खासदारांनी पक्षांतराच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आधी लोकसभेत आपला एक वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर या गटाने थेट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. मात्र, आता लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला मंजुरी दिल्यामुळे या सहाही जणांची खासदारकी सुरक्षित झाली असून ठाकरे गटाला कायदेशीर लढाईत मोठा फटका बसला आहे.

आणखी वाचा

Gondia Crime News: हातावर लिहून मागितली लाच, पण डाव फसला! भाजप नगराध्यक्षाला ACB ने रंगेहाथ पकडलं; नेमकं काय घडलं?

Comments are closed.