उद्धव ठाकरे काल दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!

उद्धव ठाकरे दिल्लीत : राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून काढण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चाला दिल्ली पोलिसांकडून ठोकून काढल्यानंतर अवघ्या देशामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. देशभरामध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात येत असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीसह अवघ्या देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना, मुलींना सुद्धा दिल्ली पोलिसांकडून रस्त्यांवरती सापडेल त्या ठिकाणी ठोकून काढण्यात आलं, त्यानंतर अवघा विरोधी पक्ष सुद्धा रस्त्यावर उतरला आहे. काल (21 जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानीच गनिमी काव्याने आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्यांना सुद्धा रस्त्यावरून फरफटत नेत अटक करण्यात आली आणि संध्याकाळी सुटका करण्यात आली.

राहुल गांधींना फोन फिरवला, केजरीवालांची घेतली भेट

उद्धव ठाकरे सुद्धा थेट मुंबईतून दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यांनी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांचं मनोबल उंचावलं. या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या संघर्षाला नमन करतच, “फक्त आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नको, तर या सरकारलाच घालवायला हवं,” अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज (22 जुलै) भेटीगाठी करताना आंदोलनाला योग्य दिशेनं नेण्यासाठी चर्चा केली. आज सकाळी त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आंदोलनासंदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा सरकारकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याने वेगळ्या रणनीतीची गरज निर्माण झाली आहे.” असे मत व्यक्त केले.

हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा

दुसरीकडे, राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी तयारी करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर ज्या पद्धतीने मोठं आंदोलन उभं राहिलं आहे, दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतरही विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकजुट दाखवत जंतर-मंतरवरती तळ ठोकला आहे त्या पद्धतीने आंदोलन उभं राहणार का? याकडे लक्ष असेल.

पोरीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीकडून आता कोणत्याही ठिकाणी चर्चेला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. जर चर्चा करायची असेल तर ती जंतर-मंतरवर चर्चा करावी, असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे. आज संसदेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद उमटले. त्यामुळे आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेमध्ये विरोधी पक्षातील खासदार काळ्या पोषाखामध्ये पोहोचले. त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती प्रहार केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी “पोरीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” अशी विचारणा केली आणि “नाइलाजाने पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याची वेळ आल्याचं”ही अखिलेश यादव यांनी सांगितलं.

त्यामुळे आता ज्या पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरण्यात आला आहे, अगदी त्याच पद्धतीने आता राज्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. दरम्यान, आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत ‘वन नेशन, वन इमोशन’ म्हणत सामूहिक राष्ट्रगीताची घोषणा केली आहे. त्यामुळे एक प्रकारे आता शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाला राज्यामध्ये सुद्धा ताकद देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईकर तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद

दरम्यान, दिल्लीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला सुद्धा मुंबईकर तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद लाभला होता. इतकेच नव्हे तर जेव्हा सोनम वांगचुक हे उपोषण सोडत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर फोनाफोनी करून सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी विरोधी पक्षांना मैदानामध्ये उतरण्याचं आवाहन केलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.