मी दररोज सकाळी उठून स्वतःला प्रश्न विचारतो की, मी अजून जास्त मेहनत का करावी? सरफराज खानने व्यक्त केली खंत, म्हणाला…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आला आहे. मात्र, टीम इंडियामध्ये नियमित स्थान मिळवण्यात त्याला अद्यापही यश आलेलं नाही. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात निवड न झाल्यामुळे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने सुरुवातीला मनात निराशा येत असली, तरी वडील नौशाद खान यांची मेहनत आणि स्वतःचे क्रिकेटवरील अतूट प्रेम यांमुळेच आपण पुन्हा जोमाने मैदानात उतरत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, सरफराज खानने आपल्या भावना व्यक्त करताना एक प्रकारे स्वत:ला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणाला “मी दररोज सकाळी उठून स्वतःला प्रश्न विचारतो की, मी अजून जास्त मेहनत का करावी? आधीच टीम इंडियासाठी खेळलो आहे, त्यामुळे साध्या प्रयत्नांनिही मी मुंबईकडून खेळून 50 किंवा 100 धावा करू शकतो. पण जेव्हा मी अब्बूना (वडील) एवढी मेहनत करताना पाहतो, तेव्हा त्यांच्यासाठी पुन्हा मैदानात उतरून कामगिरी करावीशी वाटते,” असे त्याने नमूद केले. तसेच, घरबसणे मला आवडत नाही आणि रणजी करंडक असो वा हिंदुस्थानचा संघ, मला फक्त क्रिकेट खेळायचे आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.

निवडकर्त्यांच्या भूमिकेवर आणि फिटनेसवर भाष्य करताना सरफराज म्हणाला की, त्याला केवळ हिंदुस्थानच्या परिस्थितीसाठीच योग्य मानले जात असल्याचा युक्तिवाद चुकीचा आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील (सामन्यांदरम्यान) शतकांचा दाखला देत त्याने परदेशातही चांगली कामगिरी केल्याचे सांगितले. याशिवाय, हंगाम नसतानाही कठोर मेहनत घेऊन आपले वजन 97 किलोवरून 77 किलोवर आणल्याचे सांगत, त्याने मजेशीर अंदाजात “मी जाड असताना जास्त चांगला खेळायचो,” अशी टिप्पणीही केली. मात्र, मेहनत घेणे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणे हाच आपला एकमेव उद्देश असल्याचे त्याने शेवटी स्पष्ट केले.

Comments are closed.