११ महिन्यांपूर्वी बांधलेला सायकल ट्रॅक पुन्हा फोडला, ठाणेकरांच्या १० कोटींचा चुराडा

११ महिन्यांपूर्वी बांधलेल्या पोखरण रोड येथील हॅप्पी व्हॅली ते खेवरा सर्कलपर्यंतच्या सायकल ट्रॅकवर ठाणे पालिका प्रशासनाने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना जवळपास १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सायकल ट्रॅक पुन्हा खोदल्यामुळे करदात्यांच्या पैशांचा चुराडा होत असल्याचा तीव्र संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करून कुणाचे चांगभले करण्यासाठी हा सायकल ट्रॅक नव्याने तयार केला जात आहे, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

ठाण्याच्या पोखरण रोड-२ जवळ असलेल्या हॅप्पी व्हॅली ते खेवरा सर्कलदरम्यानचा मार्ग हा स्थानिक सायकलस्वारांसाठी अत्यंत लोकप्रिय रस्ता आहे. या रस्त्याच्या लगत जानेवारी २०२६ मध्ये सायकल ट्रॅक बांधण्यात आला. या सायकल ट्रॅकची पुन्हा तोडफोड करून नव्याने काम सुरू असल्याचे पाहून आज सकाळी येणाऱ्या सायकलप्रेमींना धक्काच बसला. अवघ्या ११ महिन्यांपूर्वी बांधलेल्या या सायकल ट्रॅकची पुन्हा चिरफाड करून तो नव्याने तयार करण्यात येत असल्याची माहिती येथे काम करणाऱ्या कामगारांकडून मिळाली आहे.

ट्रॅकवर हातगाडी, फेरीवाल्यांचा कब्जा

सायकलस्वारांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या या सायकल ट्रॅकचा सायकलस्वारांकडून फारसा वापर झालाच नाही. उलट या ट्रॅकवर हातगाडी आणि फेरीवाल्यांनी कब्जा केल्यामुळे सायकल ट्रॅकचा मूळ उद्देशच निष्फळ ठरला होता. त्यातच काही सायकलप्रेमी या ट्रॅकचा आनंद घेत होते. मात्र तो ट्रॅक पुन्हा तोडण्यात येत असल्याने प्रकल्पाच्या नियोजनाबाबत स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोणाच्या आशीर्वादाने ही उधळपट्टी सुरू आहे, असा सवाल जागरूक नागरिक प्रदीप शेडगे व शशिकुमार नायर यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.