राज्यात पुन्हा पाऊस बरसणार! ‘अकवान’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह आठ राज्यांत पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘अकवान’ चक्रीवादळामुळे आठ राज्यांमध्ये पुढील चार आठवडय़ांमध्ये पाऊस बरसणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस 21 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 या कालावधीत देशाच्या विविध भागांत बरसणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अकवान’ हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली झाले आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर म्हणजे गंजाम जिह्यातील गोपाळपूरजवळ धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार ‘अकवान’ हे चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातून ताशी 19 किमी वेगाने उत्तर-वायव्यकडे सरकत आहे. हे वादळ आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून आग्नेयकडे 170 किमी आणि विशाखापट्टणमपासून पूर्व-आग्नेयकडे 200 किमी आणि ओडिशातील गोपाळपूरपासून दक्षिणेकडे 240 किमी अंतरावर होते.

पुढील चार आठवडय़ांचा अंदाज

ओडिशा आणि गंगा नदीच्या पश्चिम बंगाल खोऱयात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. झारखंड, आसाम, केरळ व तामीळनाडूत 26 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत केरळ, तामीळनाडू, दक्षिण कर्नाटकातील काही भाग व आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे. 10 डिसेंबरपर्यंत दक्षिण भारतातील अनेक भागांसह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात 17 डिसेंबरपर्यंत पावसाचे संकेत आहेत.

Comments are closed.