इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रखडणार; वाढीव खर्चाचा प्रस्ताव पडून, कामाच्या मंदगतीमुळे 2 वर्षे विलंब

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम मंदावले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम बंद आहे. त्यामुळे इंदू मिल स्मारक पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्मारकाचे काम याच वर्षी पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे. आखाती युद्धामुळे जागतिक स्तरावर तांबे आणि एलपीजी गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. त्यासाठी अतिरिक्त 350 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे स्मारकाचे काम रखडले आहे. या स्मारकातील ग्रंथालय, संग्रहालय आणि सभागृहाचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले आहे. काम रखडल्यामुळे 763 कोटी रुपयांना दिलेल्या कामाची किंमत आता 1200 कोटींच्याही पुढे जाणार आहे.

2018 मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट शापूरजी पालनजी ग्रुपला देण्यात आले होते. त्यावेळी अंदाजित खर्च 763 कोटी ते 783 कोटी इतका होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची सुरुवातीला 250 फूट होती, ती नंतर 350 फूट करण्यात आली. दरम्यान कच्चा माल महागला व स्मारकाचे अंदाजपत्रक 1089 कोटींवर पोहोचले.

Comments are closed.