‘सूर्या’ प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी ठाणेकरांना देण्यास भाजपचा विरोध; शिंदे गट-भाजपमध्ये जुंपली, राजकीय संघर्ष टोकाला
मीरा-भाईंदरकरांच्या घरातील नळ अजूनही सूर्या धरणाच्या पाण्याने ओले झालेले नसतानाच या प्रकल्पाच्या पाणी वाटपावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘सूर्या’चे अतिरिक्त 12 एमएलडी पाणी ठाणेकरांना देण्यास भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. यावरून भाजप-शिंदे गटात जुंपली असून या राजकीय साठमारीत ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता आहे.
सूर्या धरण पाणीपुरवठा योजनेतून मीरा-भाईंदरला 218 एमएलडी, वसई-विरारला 170 एमएलडी तर 44 गावांसाठी 15 एमएलडी पाणी प्रस्तावित आहे. प्रकल्पातून एकूण 415 एमएलडी पाणी उपलब्ध होणे अपेक्षित असून या तिन्ही घटकांचे प्रस्तावित वाटप 403 एमएलडी होते. त्यानुसार सुमारे 12 एमएलडी पाणी शिल्लक राहणार आहे. याच अतिरिक्त पाण्याच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. हे पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे स्थानिक नेते व लोकप्रतिनिधी चांगलेच भडकले आहेत.
तडजोड न करण्याचा महापौरांचा इशारा
मीरा-भाईंदर शहराच्या हक्काचे पाणी ठाण्याकडे वळविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी ठासून सांगितले. तर शहरातील नागरिकांच्या पाण्याच्या हक्काशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूर्या प्रकल्पाचे पाणी ठाणे शहराला देण्याबाबत निर्णय झाला होता, असे सांगितले. 12 एमएलडी अतिरिक्त पाणीवाटपावरून भाजप व मिंधे गटातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
सुमारे 14 लाख लोकसंख्या असलेल्या मीरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून 125 एमएलडी आणि स्टेम प्राधिकरणाकडून 86 एमएलडी असा एकूण 211 एमएलडी पाणीकोटा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात सुमारे 200 एमएलडी पाणीच मिळते.
नागरिकांना 40 ते 45 तासांच्या अंतराने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यातच एल निनोच्या पाश्र्वभूमीवर लागू झालेल्या 10 टक्के पाणीकपातीमुळे पाणीपुरवठ्याचे अंतर तब्बल 72 तासांपर्यंत पोहोचले आहे.
एमएमआरडीएमार्फत सूर्या योजनेचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला 36 महिन्यांची मुदत असलेल्या या प्रकल्पाला आता 120 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. वसई-विरारला 2024पासून सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळण्यास सुरुवात झाली, मात्र मीरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.
Comments are closed.